त्या हिंदी मालिकेच्या सेटवर खिल्ली उडवली जायची मी रडत रडत घरी आले…निवेदिता सराफ यांचा तो किस्सा
निवेदिता सराफ यांनी बालवयातच रंगभूमीवर पाऊल टाकले होते. आई विमल जोशी याही उत्तम अभिनेत्री तर वडील गजन जोशी हे देखणे अभिनेते म्हणून मराठी इंडस्ट्रीत ओळखले जात असत. वडिलांचे निधन झाल्याने निवेदिता आणि बहीण मिनलची जबाबदारी त्यांच्या आईने व्यवस्थित पार पाडली होती. आई बऱ्याचदा नोकरीनिमित्त बाहेर असल्याने मोठी बहीण मीनलकडूनच त्यांच्यावर संस्कार घडत गेले असे त्या नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगतात. चंदाराणी हे निवेदिता सराफ यांचे शाळेतील नाव मोठ्या बहिणीनेच हे नाव ठेवले होते. पुढे बबन प्रभूंनीच त्यांचे हे नाव बदलून निवेदिता केले होते. नाटक, चित्रपट करत असताना १९८४ साली त्यांनी ‘ये जो है जिंदगी’ ही हिंदी मालिका केली होती. या मालिकेच्या सेटवर कलकारांकडून त्यांची खिल्ली उडवण्यात येत होती.
हा किस्सा सांगताना निवेदिता सराफ म्हणतात की, “त्याकाळी उत्तर भारतीयांचे हिंदी मालिकांमध्ये वर्चस्व असायचे. पंजाबी, गुजराथी भाषिक कलाकारांना जास्त संधी दिली जायची. मराठी कलाकारांना ते अगदी घाटी म्हणूनच हाक मारायचे. पंजाबी कलाकारांचा बोलण्याचा लहेजा थोडासा त्यांच्याच भाषेत असायचा त्यामुळे हिंदी बोलताना त्यात त्यांची भाषा जाणवायची गुजराथी कलाकार सुद्धा हिंदी बोलताना त्यांच्या भाषेचा लहेजा वापरायचे. आपल्याकडेही हिंदी बोलताना थोडासा मराठी भाषेचा प्रभाव पडतो. तेव्हा माझी हिंदी ऐकून सेटवरचे सगळे जण हसायचे, खिल्ली उडवायचे. पण एक दिवस मला ते सहन झाले माही मी रडत रडत घरी आले तेव्हा मी मालिकेत काम करणार नाही असे आईला सांगितले. तेव्हा आईने मला समजावलं की, मालिका सोडणे ही गोष्ट तुझ्यासाठी सहज शक्य आहे पण तू हे आव्हान स्वीकारावं असा तिने मला सल्ला दिला. त्यानंतर मी फक्त हिंदीच चांगली बोलू शकले असे नाही तर मी उर्दू भाषेचेही धडे गिरवले.
आणि त्याच कलाकारांच्या टीमसोबत मी उर्दू भाषेत असलेलं ‘खालिद की खाला’ हे नाटक केले. हे नाटक मोरूची मावशी या नाटकावरून घेण्यात आलं होतं. आज मला प्रेक्षकांकडून हे एवढं प्रेम मिळतंय त्यासाठी मी त्यांची खूप आभारी आहे. माझा मराठी कुटुंबात , हिंदू धर्मात जन्म झाला हे मी माझं भाग्य समजते. एका सुसंस्कृत कुटुंबात जन्माला आले जिथे मला मुलगी म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून पाहिलं गेलं, चांगले संस्कार घडत गेले, चांगल्या व्यक्तीशी माझा संसार झाला. मालिकेत काम करताना आज या मुलांकडून मला जो सन्मान मिळतोय हे तर मी माझं एक मोठं भाग्य समजते, प्रेक्षकांकडूनही मला आदर सन्मान दिला जातो हे माझ्यासाठी खरंच खूप भाग्याचं आहे असे मी समजते.” असे त्या म्हणतात.