तेजश्री प्रधान सध्या प्रेमाची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेला प्रसारित होऊन काहीच दिवस झाले आहेत. तरीही तेजश्री प्रधानची मालिका म्हणून लोक तिच्या या मालिकेला खूप चांगला प्रतिसाद देत आहेत. त्याचमुळे टीआरपीच्या स्पर्धेत या मालिकेने तिसरा क्रमांक पटकवलेला पाहायला मिळतो. मुक्ता आणि सागर यांचे वाद आणि नोकझोक अजूनही सुरूच आहे पण सागरच्या मुलीचा तिला खूप लळा लागला आहे. सागरने त्याच्या मुलीकडे लक्ष द्यायला हवे म्हणून ती सतत त्याची कानउघडणी करताना दिसते. तेजश्री प्रधान होणार सून मी ह्या घरची मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करून होती. या मालिकेमुळे तिला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. मालिकेला प्रसारित होऊन जवळपास १० वर्षे झाली आहेत पण तिची जान्हवीची भूमिका अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
या मालिकेला दहा वर्षे झाली यानिमित्ताने मालिकेच्या कलाकारांचे रियुनियन पाहायला मिळाले. यावेळी शशांक केतकर आणि निर्मात्यांनी मालिकेच्या काही खास आठवणी इथे शेअर केल्या. शशांकला देखील या मालिकेमुळेच खूप प्रसिद्धी मिळाली होती. रोहिणी हट्टंगडी या मालिकेच्या टीमच्या सर्वात वयस्कर मेम्बर आणि त्यांच्या अभिनयाचा अनुभवही तेवढाच दांडगा होता त्यामुळे त्या खूप कडक शिस्तीच्या किंवा कामाशी काम ठेवणाऱ्या असाव्यात असं शशांकला वाटत होतं. पण त्या मालिकेच्या सेटवर सगळ्यांशी मिळून मिसळून वागायच्या. त्यांच्याकडे स्वतःची व्हॅनिटी व्हॅन होती पण तरीही ती व्हॅनिटी सोडून त्या आमच्यासोबत बसत होत्या. कुठलीही अढी किंवा राग त्यांच्याकडे नसायचा. त्याचमुळे मालिकेत त्यांच्यासोबत काम करायला मज्जा यायची असे तो म्हणतो. मालिकेच्या निर्मात्यांनी सेटवरचा एक किस्सा सांगितला.
मालिकेत जान्हवीच्या बाबांचे ऑपरेशन होणार असते. त्यासाठी जान्हवी पैसे गोळा करत असते. हा सिन झाल्यानंतर मालिकेचे चाहते सेटवर येऊन जान्हवी म्हणजेच तेजश्री प्रधानची भेट घ्यायचे. तेजश्रीकडे ते काही पैसे देत होते हे पाहून आम्ही सगळे चकित झालो होतो. बाबांचे ऑपरेशन व्हावे म्हणून जान्हवीची तळमळ त्यांना मालिकेतून दिसून येत होती. त्यामुळे लोक तिची बाहेर घेऊन पैसे देऊ लागले. स्वतः तेजश्रीला सुद्धा या सगळ्या अनुभवाचे मोठे आश्चर्य वाटत असे. कारण एखादी मालिका साकारत असताना त्यातील भूमिका सजग करणे हे मोठे दिव्याचे काम असते. लोकांच्या या प्रतिसादावरून त्यांना ही मालिका खरी वाटत होती आणि म्हणूनच ते तिला पैसे देत होते. मालिकेचा हा अनुभव आमच्यासाठी खूपच अविस्मरणीय आहे असे मालिकेचे निर्माते सांगतात.