कुठल्याही व्यक्तीची प्राथमिक गरज ही आपल्या हक्काचं घर असावं अशी असते. स्ट्रगलच्या काळात भाड्याच्या घरात राहून अनेक कलाकारांनी यशाचा पल्ला गाठला आहे. अशातच आता मराठी सृष्टीत गेल्या काही दिवसांपासून स्वतःच्या हक्काचं घर खरेदी करण्यावर भर दिला जात आहे. महत्वाचं म्हणजे मराठी इंडस्ट्रीत एवढे वर्षे कार्यरत असणाऱ्या सई ताम्हणकरलाही वाटलं की आता भाड्याच्या घरात राहण्यापेक्षा आपण आपल्या हक्काच्या घरात सेटल व्हावं म्हणूनच तिने काही दिवसांपूर्वीच मुंबईत आपलं हक्काचं घर खरेदी केलं. तर अभिनेत्री ऋतुजा बागवे, मीरा जोशी, स्मिता शेवाळे, राधा सागर, प्राजक्ता माळी, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसाद खांडेकर या कलाकारांनी देखील स्वतःचं घर खरेदी केलं.

या कलाकारांपाठोपाठ अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने घर खरेदी केल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. “स्वप्न खरी होतात” असे म्हणत तिने या नवीन घराची झलक चाहत्यांना दाखवली आहे. सध्या धनश्री काडगावकर तू चाल पुढं या मालिकेतून शिल्पीची भूमिका साकारत आहे. नुकतेच धनश्रीने तिच्या नवीन घराचा ताबा घेतला आहे. मुंबईत आपलं हक्काचं घर असावं अशी धनश्रीची इच्छा होती तीची ही इच्छा आता पूर्णत्वास आलेली आहे. धनश्री तिचा नवरा दुर्वेश देशमुख सोबत पुण्याला राहत होती. मात्र मालिकेच्या शूटिंगनिमित्त तिला मुंबई पुणे असा सतत प्रवास करावा लागत असे. आपल्याला अभिनय क्षेत्रातच करिअर करायचंय या दृष्टीने तिने मुंबईत घर घेण्याचा विचार केला. त्यात तिला तिच्या नवऱ्याचीही साथ मिळाली. शिवाय धनश्रीचा मुलगा कबीर हा देखील अजून खूप लहान आहे.

शूटिंगला जावं लागत असल्याने ती कबिरला वेळ देऊ शकत नव्हती. पण आता मुंबईत घर घेतल्याने ही मोठी अडचण मार्गी लागेल या विचाराने तिने मुंबईत घर घेण्याचा विचार केला. धनश्रीने चिठ्ठी या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाऊल टाकले होते. तुझ्यात जीव रंगला मालिकेत तिने नंदिताची विरोधी भूमिका चांगलीच गाजवली होती. या भूमिकेमुळे धनश्री प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यानंतर धनश्रीने कबीरच्या जन्मानंतर अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला. मात्र तू चाल पुढं मालिकेतून ती पुन्हा एकदा दमदार भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. मोजक्याच कलाकृतीतून धनश्रीने तिच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत आणि म्हणूनच तिला हा यशाचा टप्पा गाठता आला आहे.



