सुभेदार या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर… दिगपाल लांजेकरांनी केली “शिवरायांचा छावा” आगामी चित्रपटाची घोषणा
फर्जंद, पावनखिंड, फत्तेशीकस्त, शेर शिवराज आणि सुभेदार या चित्रपटांच्या घवघवीत यशानंतर दिग्दर्शक , लेखक दिग्पाल लांजेकर यांनी “शिवरायांचा छावा” या त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा नुकतीच केली आहे. मल्हार पिक्चर्स कं आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत शिवरायांचा छावा या चित्रपटाची निर्मिती वैभव भोर आणि किशोर पाटकर करणार आहेत. येत्या १६ फेब्रुवारी २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित भव्य दिव्य असा हा चित्रपट आतापासूनच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. शिवरायांच्या अष्टकापैकी हे सहावे पुष्प पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत कोणता कलाकार दिसणार हे अजून गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. दरम्यान दिग्पाल लांजेकर यांनी त्यांच्या अगोदरच्या चित्रपटात अजय पुरकर यांना प्रमुख भूमिका साकारण्याची संधी दिली होती. बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे अशा प्रमुख भूमिकेत अजय पुरकर यांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. त्यामुळे आता संभाजी महाराजांच्या भूमिकेत देखील अजय पुरकरच दिसणार की आणखी कोणत्या कलाकाराला ही संधी दिली जाते हे पाहावे लागणार आहे. दरम्यान दिग्पाल लांजेकर यांचे चित्रपट भव्य दिव्य असतात, भलीमोठी स्टारकास्ट, उत्तम संवाद लेखन आणि दर्जेदार गाणी यांमुळे त्यांच्या चित्रपटाला थिएटरमध्ये विशेष गर्दी होत असते. सुभेदार या चित्रपटालाही प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिल्याने चित्रपटाने कोट्यवधींची कमाई केली होती. डॉ अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास त्यांच्या स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून छोट्या पडद्यावर दाखवला होता. हाच इतिहास आता तुम्हाला मोठया पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे. महाराजांचा इतिहास आपल्या पिढीला समजायला हवा याच हेतून हे चित्रपट बनवण्याचे आव्हान दिग्पाल लांजेकर पेलले आहे.