मराठी माणसं परदेशात जाऊनही आपली संस्कृती जपून ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मराठमोळी खाद्यसंस्कृती असो किंवा गणेशोत्सव किंवा दिवाळी यांसारखे सण असो परदेशात उपलब्ध असणाऱ्या साधन सामुग्रीतून आपली संस्कृती कशी जपता येईल याचाच ते विचार करत असतात. घर संसार आणि नोकरीतून वेळ काढून नाविन्यपूर्ण पदार्थ बनवण्याची आवड जोपासत सोनल सरगर सोनवलकर आणि संकेत सोनवलकर हे दाम्पत्य लोकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. सोनल सरगर- सोनवलकर याच कारणासाठी तिच्या इंस्टाग्रामवर सध्या चर्चेत आहे. लवकरच सोनलला तिच्या या नाविन्यपूर्ण महाराष्ट्रीयन खाद्य पदार्थांसाठी युट्युब चॅनल सुरू करण्याची इच्छा आहे. सध्या सोनवलकर कुटुंब जर्मनीमध्ये स्थायिक आहे. सोनल ही मूळची कराडची. वडील शिक्षक आणि तेही इंग्रजी भाषेचे त्यामुळे इंग्रजी भाषेची गोडी निर्माण झाली. कराडच्या कृष्णा फाउंडेशन संस्थेतून तिने एमसीएची पदवी मिळवली. सोनलचे संकेत सोनवलकर सोबत लग्न झाले.
हे लग्न पुण्यात पार पडले. संकेतने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केले होते. गेल्या ११ वर्षांपासून तो जर्मनीत शिक्षण घेऊन सध्या नोकरी करत आहे. लग्नानंतर काही दिवसात सोनल देखील जर्मनीला गेली सोनल सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. तीन महिन्यांच्या प्रयत्नानंतर तिला लगेचच नोकरी देखील मिळाली. जर्मनीत Halle(saale) या शहरात आल्यानंतर तिथल्या वातावरणाशी जुळवून घ्यायला सोनलला थोडेसे जड गेले. कारण चार ते पाच महिने भयंकर थंडी, कधी कधी बर्फ सुद्धा पडतो एव्हढेच नाही तर मायनस तापमान असल्याने अशा थंडीत जुळवून घ्यायला सुरवातीला तिला खूप कठीण गेले. जर्मनीतील बहुतांश लोकांना इंग्रजी येत नसल्याने त्यांच्या भाषेत संवाद साधण्यासाठी तिला अगोदर जर्मन भाषेचे धडे गिरवावे लागले. अर्थात या भाषेचे तिने आता क्लासेस लावले आहेत पण तरीही तिथली लोकं खूप सपोर्टिव्ह असल्याने फारशी भाषेची अडचण भासली नाही. नोकरी निमित्त सोनलला वर्षभरातच तीन वेळा देशविदेशात बिजनेस ट्रिप करावी लागली. वेग वेगळ्या देशात एकटं जायचं म्हणून तेव्हा तिला थोडीशी भीती वाटली होती पण जसजसा अनुभव येत गेला तसतसे यातून बरेच काही शिकण्यासारखे होते असे ती सांगते.
सोनल आणि संकेतला महाराष्ट्रीयन पद्धतीचंच जेवण जेवायला आवडतं. बाजरीची भाकरी, पिठलं, पुरणपोळी, थालीपीठ हे पदार्थ बनवून त्याचे फोटो ती तिच्या इंस्टाग्रामवर शेअर करते. आता गणेश चतुर्थीचे औचित्य साधून सोनलने गणपती बाप्पाचे तिच्या घरात स्वागत केले आहे. गेल्या वर्षी मूर्ती मिळते की नाही हा प्रश्न तिला होता त्यामुळे देवघरातीलच मूर्तीचे तिने पूजन केले होते. मात्र ह्यावेळी ऑनलाइन बाप्पाची खरेदी करून बाकीचे डेकोरेशन हाताने डेकोरेट केलं आहे. तिथे रांगोळी मिळत नसल्याने फुलांचीच रांगोळी तिने घरात सजवली आहे. वटपौर्णिमा सारख्या सौभाग्याचा सणाच्या दिवशी देखील वडाच झाडच मिळत नसल्याने तिने चक्क हाताने वडाचे झाड बनवून त्याची पूजा केली होती.
आवड आणि परंपरा जोपासत नोकरीतून वेळ काढत ती हे सर्व करताना पाहायला मिळते. नोकरीनिमित्त सोनलला या गोष्टींचे व्हडिओ काढून अपलोड करणे शक्य होत नाही पण आपलेही असे एक युट्युब चॅनल असावे असा तिचा मानस आहे. तिची ही इच्छा लवकरच पूर्ण होवो ही सदिच्छा. “वर्ल्ड ऑफ सोनल्स किचन” या नावाने तीच इन्स्टा पेज आहे जिथे ती आपले मराठमोळे पदाथांचे फोटो अपलोड करताना पाहायला मिळते. मराठमोळं कुटुंब परदेशात राहूनही महाराष्ट्राची संस्कृती जपवून ठेवत आहे हे पाहून नक्कीच त्यांचं कौतुक करावंसं वाटतं. त्यांच्या या यशस्वी प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.