झी मराठी वरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेचे गूढ आता हळूहळू उलगडू लागले आहे. इंद्राणी ही पद्माकर राजाध्यक्षची मुलगी आहे. पद्माकरने आपल्या आईला फसवलं म्हणूनच इंद्राणी हा बदला घेण्यासाठी या घरात दाखल झाली आहे. त्यात तिला रूपालीची देखील साथ मिळत आहे. नेत्राला आजोबांच्या मृत्यूचा संकेत मिळालेला आहे त्यामुळे ती आजोबांची काळजी घेत आहे. अशातच मनोरमाला फसवणारी व्यक्ती ही आजोबा आहे का आणि इंद्राणी आजोबांना मारायला आली आहे का असा प्रश्न नेत्राला पडलेला असतो. आजच्या भागात या प्रश्नाचा उलगडा होणार आहे. नेत्रा जेव्हा पाणी घ्यायला जाते तेव्हा रुपाली आणि इंद्राणीचे ती बोलणे ऐकते. तिला पद्माकर राज्याध्यक्षला मारायचंय हे इंद्राणीच्या बोलण्यातून तिला समजते.
हे ऐकून नेत्राला मोठा धक्का बसतो. त्यामुळे नेत्रा आता आजोबांना वाचवण्यासाठी कुठले पाऊल उचलणार याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात आहे. मागील काही भागात मनोरमाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात. मालिकेत मनोरमाचे पात्र अभिनेत्री अमृता बाने हिने साकारले आहे. अमृता बाने सुरुवातीला प्रसिद्ध न्यूज चॅनलसाठी न्यूज रीडरचे काम करत होती. पत्रकारिता ते अभिनेत्री असा तिचा प्रवास फारच उल्लेखनीय म्हणावा लागेल. न्यूज अँकर नंतर अमृता मराठी सृष्टिशी जोडली गेली. रंग माझा वेगळा, जय जय स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, कन्यादान अशा मालिकांमधून अमृताने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. प्रसिद्ध अभिनेता शुभंकर एकबोटे याच्या ती प्रेमात आहे. शुभंकर आणि अमृता दोघेही कन्यादान या मालिकेच्या सेटवर पहिल्यांदा भेटले.
कन्यादान या मालिकेमुळे त्यांच्यात मैत्री झाली आणि आता हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात असल्याचे त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केले आहे. शुभंकर हा दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा मुलगा आहे. आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकत शुभंकर सुद्धा अभिनय क्षेत्रात दाखल झाला. कन्यादान, चौक, धर्मवीर अशा अनेक चित्रपट मालिकेतून शुभंकरने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. शुभंकर आणि अमृता दोघेही एकमेकांच्या प्रेमात आहेत हे त्यांच्या पोस्टवरून त्यांनी जाही केले आहे. अनेकदा एकमेकांसोबत फिरणे असो वा वाढदिवस साजरा करणे असो या सर्वांतून दोघेही एकमेकांच्या प्रेमात असल्याचे त्यांनी उघड केले आहे.