news

घटस्फोटानंतर बराचकाळ डिप्रेशनमध्ये असलेल्या अभिनेत्याची छोट्या पडद्यावर एन्ट्री

मोठा पडदा गाजवणारे कलाकार सध्या छोट्या पडद्यावर झळकताना दिसत आहेत . अगदी प्रार्थना बेहरे, श्रेयस तळपदे, स्वप्नील जोशी यांनीही गेल्या काही दिवसांपूर्वी छोट्या पडद्यावर एन्ट्री करून मोठी लोकप्रियता मिळवली. खरं ते कलाकार छोटा पडदा गाजवल्यानंतरच चित्रपटाकडे वळले होते मात्र आता हिंदी चित्रपट गाजवणारा मराठी कलाकार चक्क मराठी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा अभिनेता आहे राकेश बापट. राकेश बापट हा मराठी तसेच हिंदी चित्रपट अभिनेता आहे. २००१ सालच्या तुम बिन या चित्रपटातून तो बॉलीवूड चित्रपटात झळकला होता. या चित्रपटामुळे राकेशला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. पण त्यानंतर काही मोजके हिंदी चित्रपट करून तो मालिकेकडे वळलेला पाहायला मिळाला. मर्यादा, सात फेरे, सलोनी अशा लोकप्रिय हिंदी मालिकेतून तो महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसला होता. वृंदावन या चित्रपटातून त्याने मराठी चित्रपट सृष्टीत प्रमुख भूमिका साकारली होती.

पण आता प्रथमच राकेश मराठी मालिका सृष्टीत पदार्पणासाठी सज्ज झालेला पाहायला मिळत आहे. झी मराठीवर लवकरच सुरू होणाऱ्या “नवरी मिळे हिटलरला” या मालिकेतून तो प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या नव्या मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. डॅशिंग एन्ट्री घेत तो अभिराम जहागीरदार हे पात्र साकारताना दिसणार आहे. या मालिकेत राकेश सोबत कोणती अभिनेत्री प्रमुख भूमिका साकारणार याची जास्त उत्सुकता आहे. कारण राकेश बापट हा एक तगडा कलाकार आहे मालिका वरचढ ठरवायची असेल तर त्याच्यासाठी तशीच एक तगडी नायिका असणे गरजेचे आहे. तरच मालिकेला चांगली लोकप्रियता मिळेल असे म्हटले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून झी मराठी वाहिनीवर नवनवीन मालिका दाखल केल्या जात आहे. नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या जोडीला पारू आणि शिवा या आणखी दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे झी मराठी वाहिनी आपला घसरलेला टीआरपी नक्कीच वर आणेल अशी आशा वाटत आहे.

rakesh bapat and ridhi dongra photos
rakesh bapat and ridhi dongra photos

दरम्यान राकेश बापट बद्दल सांगायचं तर तो २०११ साली रिधी डोगरा या हिंदी चित्रपट, मालिका अभिनेत्रीसोबत विवाहबद्ध झाला होता. पण सात वर्षांच्या सुखी संसाराला कुठेतरी गालबोट लागले आणि त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. रिधी ही जेनेलिया आणि रितेश देशमुख यांची बेस्ट फ्रेंड देखील आहे. मधल्या काळात राकेशने ओटीटी प्लॅटफॉर्म वरील बिग बॉसमध्ये एन्ट्री केली होती. तेव्हा शमिता शेट्टी सोबत त्याचे नाव जोडण्यात आले होते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आहेत असे या शोमध्ये भासवण्यात आले होते. मात्र जसा बिग बॉसचा शो संपला तसे शमिता शेट्टीने त्याला बाजूला लोटलेले पाहायला मिळाले. अर्थात हा सर्व पब्लिसिटी स्टंट होता हे त्यांच्या खोट्या प्रेमावरूनच स्पष्ट झाले होते. त्यानंतर राकेश खुर्ची या मराठी चित्रपटात झळकला. आणि आता तो मराठी मालिका सृष्टीत पदार्पण करताना दिसत आहे. या नवीन मालिकेसाठी राकेश बापटला सेलिब्रिटींकडून शुभेच्छा मिळत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button