सोमवारी २९ जानेवारी रोजी पुण्यात माधवी महाजनी यांच्या ‘चौथा अंक’ या पुस्तकाचा प्रकाशनसोहळा पार पडला. चौथा अंक हे माधवी महाजनी यांचे आत्मचरित्र असल्याचे सांगण्यात आले आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मुलगा गश्मीर महाजनी आणि मुलगी रश्मी हिनेही हजेरी लावली होती. या पुस्तकाचे शब्दांकन माधुरी तळवलकर यांनी केलेले आहे. खरं तर रविंद्र महाजनी यांच्या निधना अगोदरच हे पुस्तक लिहून तयार झाले होते फक्त ते प्रकाशित करण्याचे थांबले होते. पण अचानकपणे रविंद्र महाजनी यांचे निधन झाले त्यानंतर पुस्तकाचे काम मागे पडले. पण काही दिवसांनी पुन्हा या पुस्तकात बदल करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर माझी जी परिस्थिती होती ती मी इथे मांडली आहे असे त्या म्हणतात. माधवी महाजनी यांना हे पुस्तक लिहायचे नव्हते पण जवळच्या नातेवाईकांनी त्यांना लिहिण्यासाठी प्रवृत्त केले. यात त्यांनी त्यांच्या आयुष्यात जे काही घडलंय ते अगदी जसच्या तसं लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
याबद्दल माधवी महाजनी म्हणतात की, ‘माझ्या आयुष्यात जे काही घडलं ते सगळं मी यात लिहिलं आहे. कुणालाही नायक बनवण्याचा किंवा कुणालाही व्हिलन बनवण्याचा यात माझा मुळीच उद्देश नाही. जे सुख, दुःख मी अनुभवलंय ते सगळं मी त्यात लिहिलेलं आहे.’ असे माधवी महाजनी सांगतात. पुस्तकाला शीर्षक काय द्यायचे यावर दोन तीन आठवडे विचार चालू होते. तेव्हा चित्रपटाच्या एका जुन्या गाण्याचं शीर्षक द्यावं असा गश्मीरने विचार केला. ‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या’ असे नाव त्याच्या डोक्यात होते. पण एकदा बोलता बोलता त्याने आईच्या तोंडून चौथा अंक शब्द ऐकला. “नाटकाचे तीन अंक असतात तेव्हा त्या कलाकाराबद्दलची एक प्रतिमा आपल्या मनात तयार झालेली असते एक भाऊ, वडील म्हणून. पण जेव्हा तो कलाकार त्याच्या घरी जातो तेव्हा त्याचा चौथा अंक सुरू होतो म्हणून या पुस्तकाला चौथा अंक हे नाव देण्यात आलं.
तिच्या आयुष्याचा हा चौथा अंक तिने या पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे” असे गश्मीर म्हणतो. “ही घटना घडल्यानंतर काहितरी चवीने वाचायला मिळेल त्यांच्यासाठी हे पुस्तक नाहीये कारण तिने तिच्या आयुष्यात जे अनुभवलंय तेच या पुस्तकात आत्मचरित्राच्या रूपाने मांडलं आहे. जे आहे ते सगळं खरं आणि प्रांजळपणे मांडलं आहे त्यात कुणालाही जज केलेलं नाही. काही मजेशीर घटना, रोमँटिक, आनंद देणाऱ्या, तर काही दुःखी घटनाही तिने त्यात मांडल्या आहेत. काही गोष्टी लिहिण्यासाठी ती बिचकली होती बापरे हेही लिहावं लागेल का? असा तिला प्रश्न पडला होता, तेव्हा मीच तिला म्हटलं होतं की हे तुझं आत्मचरित्र आहे त्यामुळे जे आहे ते सगळं तुला खरं लिहावं लागणार आहे ” असे स्पष्टीकरणही गश्मीर यावेळी देतो.