महेश कोठारे दिग्दर्शित ‘झपाटलेला’ या चित्रपटाचा तिसरा सिकवल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पाहायला मिळाली. पण आता स्वतः महेश कोठारे यांनी या तिसऱ्या सिकवल ची घोषणा केलेली पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच लॉन्च करण्यात आले असून तात्या विंचूच्या चेहऱ्यासोबत तुम्हाला त्यात आदिनाथ कोठारेचा चेहरा पाहायला मिळत आहे. खरं तर या पोस्टरमध्ये अर्धवट असलेला आदिनाथ कोठारे याचा चेहरा समोर बघतोय की तिरकस बघतोय यामध्ये गूढ लपलेले आहे. त्यामुळे या चित्रपटात नेमकं काय बघायला मिळणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली आहे.
झपाटलेला हा त्यांचा आगामी चित्रपट २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असे त्यांनी जाहीर केले आहे. दरम्यान महेश कोठारे स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत तर निर्मिती रजनीश खनुजा आणि महेश कोठारे यांची असणार आहे. महत्वाचं म्हणजे आदिनाथ कोठरे यालाच त्यांनी मुख्य भूमिका देऊ केली आहे. १९९३ साली झपाटलेला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. लक्ष्मीकांत बेर्डे याने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. तर २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या दुसऱ्या सिकवलमध्ये लक्ष्याचा मुलगा बनून आदिनाथ कोठारेने या चित्रपटाची धुरा संभाळलेली पाहायला मिळाली होती. तात्या विंचू हे मध्यवर्ती भूमिकेत ठेवून पुन्हा एकदा त्यांचा थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार असल्याने त्यांच्या तिसऱ्या चित्रपटाबाबत प्रेक्षकांनी उत्सुकता दर्शवली आहे. या दोन्ही चित्रपटात राघवेंद्र काडकोळ यांनी बाबा चमत्कार हे पात्र तर विजय चव्हाण यांनी सखाराम हवालदार अशा महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
पण आता या दोन्ही कलाकारांच्या पश्चात ही जागा कोण भरून काढणार असे प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. तसेच दोन्ही चित्रपटात लक्षाच्या आईच्या भूमिकेत मधू कांबिकर दिसल्या होत्या पण मधू कांबिकर या गेल्या काही वर्षांपासून अर्धांगवायू झाल्याने अंथरुणाला खिळून आहेत. त्यामुळे या कलाकारांना प्रेक्षक नक्कीच मिस करणार. दरम्यान महेश कोठारे यांनी चित्रपटाचे कथानक ठरवून ठेवले आहे. फक्त त्यात कोणकोणत्या नायीकांना अभिनयाची संधी मिळणार हे पाहावे लागेल. कारण दुसऱ्या सिकवलमध्ये सोनाली कुलकर्णी हिने नायिकेची भूमिका साकारली होती. आता तिसऱ्या सिकवलमध्येही सोनाली कुलकर्णीला ही संधी मिळणार का हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.