अमेरिकेचा हा टेनिसपटू आहे अर्चना जोगळेकर यांचा मुलगा…वडील सायंटिस्ट आणि मोठा व्यवसाय तर आई अभिनेत्री असूनही
सिनेसृष्टीत अशा बऱ्याच नायिका आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाने एक काळ गाजवून या क्षेत्राला कायमचा रामराम ठोकलेला पाहायला मिळाला. ९० च्या दशकाची मराठी सृष्टीची नायिका अर्चना जोगळेकर याही त्यातल्याच एक म्हणाव्या लागतील. कारण ऐन प्रसिद्धीच्या काळात अर्चना जोगळेकर यांनी लग्न करून यूएसला जायचा निर्णय घेतला. आज यांच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी आपण इथे जाणून घेऊयात. अर्चना जोगळेकर यांनी मराठीसह हिंदी चित्रपट सृष्टीतही स्वतःची एक वेगळी ओळख बनवली होती. सायंटिस्ट असलेल्या डॉ निर्मल मुळ्ये यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या आणि अभिनय क्षेत्राला त्यांनी कायमचा रामराम ठोकला. निर्मल मुळ्ये हे मूळचे संगमेश्वरचे. पण मुंबई युनिव्हर्सिटीमधून पीएचडी केल्यानंतर ते यूएसमध्ये गेले. तिथे त्यांनी नोकरी करत असताना १७ ते १८ क्रेडिट कार्ड्स जमवले. यातूनच लाखो रुपयांचे कर्ज घेऊन स्वतःचा ‘Nostrum Pharmaceuticals’ चा बिजनेस सुरू केला. ‘Nostrum energy’ हा आणखी एक बिजनेस त्यांनी उभारला.
लग्नानंतर अर्चना जोगळेकर यूएसला गेल्या होत्या तिथेच त्यांनी आवड म्हणून नृत्याचे क्लासेस सुरू केले होते. याच दरम्यान त्यांना मुलगा झाला. ध्रुव हा त्यांचा मुलगा आई आणि वडिलांचे गुण घेऊनच जन्माला आला होता. कारण लहान असल्यापासूनच ध्रुव खूप हुशार होता. खूप कमी वयातच तो तबला वाजवायला शिकला होता. वयाच्या ३ ऱ्या वर्षात त्याला बेरीज, वजाबाकी करता येत होती. १ ते १०० अंक पाठ होते त्याच स्पीडने तो १०० ते १ पर्यंत उलटे अंक म्हणायचा. ध्रुवची ही अचाट बुद्धिमत्ता पाहून अर्चना जोगळेकर यांना मुलाचे भवितव्य उज्वल असल्याचे जाणवले होते. वयाच्या पाचव्या वर्षी त्याला चेस खेळण्याची आवड निर्माण झाली होती. तेव्हा त्यांनी घरा जवळच असलेल्या एका क्लासमध्ये त्याचे नाव नोंदवले होते. वयाच्या सहाव्या वर्षात ध्रुवने चेसच्या अनेक टुर्नामेंट्स खेळल्या होत्या आणि त्यात बक्षिसं देखील जिंकली होती. चेस सोबतच तो एक आवड म्हणून टेनिस देखील खेळत होता. ९ वी इयत्तेत असताना त्याला टेनिसच्या इंटरस्कुल स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली. याचवेळी त्याने टेनिस खेळाचा करिअर म्हणून मार्ग निवडला. त्यावेळी अर्चना जोगळेकर यांना हा खेळ खूप महागडा आहे असे वाटले आणि आपला मुलगा त्या लेव्हल पर्यंत हा खेळू शकेल का? असा प्रश्न त्यांच्या मनात घोळत होता. पण मुलाच्या इच्छेखातर त्यांनी यूएसच्या टॉप टेनिस प्लेअर अँडी रॉडीकच्या कोचचा फोन नंबर मिळवला आणि त्याच्या अकॅडमीत प्रवेश मिळवला.
समोर टॉपचे प्लेअर असताना ध्रुवने स्पेनची एक टुर्नामेंट जिंकली होती. टेनिस खेळातच ध्रुवने त्याचे करिअर घडवले आहे. आता तो २२ वर्षांचा आहे. गेल्या चार वर्षांपासून तो पोर्तुगाल, स्पेनच्या टुर्नामेंट्स खेळतो आहे. यूएस टेनिस प्लेअर म्हणून तो नाव लौकिक करतो आहे. ‘फक्त डिग्री असण्यापेक्षा त्याला ज्याची आवड आहे, त्याची जी स्वप्न त्याने पाहिली आहेत ती आम्ही पूर्ण करण्याचा, त्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहोत’ असे मत अर्चना जोगळेकर व्यक्त करतात. त्या पुढे असेही म्हणतात की, ‘तसंही टेनिस खेळाडूंचा कार्यकाळ अल्पावधीचा असतो. डिग्री असेल तर नोकरी करावी लागते सुदैवाने असं त्याच्याबाबत मुळीच होणार नाही कारण त्याच्या वडिलांनी त्यांचा चांगला बिजनेस उभारला आहे. हा बिजनेस सांभाळण्याची त्याची कुवत आहे. एक आई म्हणून त्याची सगळी स्वप्न पूर्ण व्हावीत एवढीच माझी अपेक्षा आहे.’ असे अर्चना जोगळेकर आपल्या मुलाने निवडलेल्या करिअर बाबत सांगतात. दरम्यान अर्चना जोगळेकर यांना लेखिका, दिग्दर्शिका म्हणून या चंदेरी दुनियेत पुन्हा एकदा पाऊल टाकायचे आहे. ‘मुलगा लहान होता तेव्हा ते शक्य नव्हतं, पण आता तो सेटल झाला आहे म्हणून मी लवकरच या सृष्टीत लेखिका, दिग्दर्शिका बनून दाखल होईल’ असा विश्वास त्यांनी चाहत्यांना दिला आहे.