‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ अभिनेत्याला ऑडिशनला गेल्यावर चक्क वॉचमनने हाकलून दिले होते पण त्यानंतर
तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत लवकरच अधिपती आणि अक्षराच्या लग्नाचा सोहळा रंगलेला पाहायला मिळणार आहे. तूर्तास अक्षरा आणि अधिपतीच्या साखरपुड्यात कमलरावांनी जो गोंधळ घातला तो गोंधळ पाहून स्वतः अक्षरानेच त्याला मंडपातून जायला भाग पाडले आहे. पण भुवनेश्वरीने आपल्याला फसवलं आणि त्यांच्या जाळ्यात आपण ओढले गेलो ही सल कमलच्या मनात घर करून आहे. त्यामुळे पुढे जाऊन हा कमल मालिकेत धक्कादायक ट्विस्ट आणणार याची खात्री वाटते. सध्या कमलराव हे पात्र मालिकेत नकारात्मक भूमिकेत दिसत आहे. हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात…
मालिकेत कमलची भूमिका अक्षय विंचूरकर याने साकारली आहे. अक्षय विंचूरकर हा अभिनेता, मॉडेल तसेच व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे. कल्याणध्ये अक्षयचे बालपण गेले. शाळेत असल्यापासूनच अक्षय नाटकातून काम करत असे. पुढे कॉलेजमध्ये त्याने नाटकाचा ग्रुप जॉईन केला. यातूनच त्याच्या उत्कृष्ट अभिनयाला पारितोषिक मिळत गेले. घरात मॅरीड बाहेर बॅचलर या व्यावसायिक नाटकात तो एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसला. मेरे साई, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा, स्वराज्य जननी जिजामाता , पेटपुराण अशा वेबसिरीज तसेच मालिकांमधून तो छोट्या छोट्या भूमिकेत झळकला. ब्रेव्ह हार्टस या हिंदी वेबसिरीजमध्ये त्याला अभिनयाची संधी मिळाली. त्यानंतर जाहिरात क्षेत्रातही अक्षयने नाव कमावले. हिंदी जाहिरातींसाठी त्याने व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम केले. सुरुवातीला या क्षेत्रात जम बसवताना अक्षयला थोडासा स्ट्रगल करावा लागला होता.
ज्या ठिकाणी ऑडिशनला त्याला बोलावले होते तिथल्या वॉचमनने त्याला हाकलले होते त्यानंतर एक वर्षाने त्याच बिल्डिंगमध्ये त्याला शूटिंगसाठी बोलावले होते. हा किस्सा अक्षयने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितला आहे. अक्षयला टिव्हीएफ बरोबर काम करण्याची इच्छा होती. बाईकवरून अक्षय त्यांच्या जुन्या ऑफिसला गेला होता तर वॉचनने इथे काहीच शूटिंग वगैरे नसल्याचे सांगितले आणि तिथून हाकलून लावले. त्यानंतर एक वर्षानेच कास्टिंग डायरेक्ट शंतनूने मला फोन केला आणि पिचर्स सिजन २ साठी ऑडिशन द्यायला सांगितले. त्यात माझी निवड झाली आणि जिथून मला त्या वॉचमनने परत पाठवलं होतं त्याच बिल्डिंग मध्ये मी या सिरीजसाठी शूटिंग करत होतो. अशी एक खास आठवण अक्षयने यावेळी सांगितली.