
निवेदिता सराफ यांनी अग्गबाई सासूबाई या मालिकेतून प्रमुख भूमिका साकारलेली पाहायला मिळाली होती. या मालिकेनंतर त्या भाग्य दिले तू मला मालिकेत सहाय्यक भूमिकेत दिसल्या होत्या. पण आता लवकरच निवेदिता सराफ या पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. सध्या स्टार प्रवाहची वाहिनी टीआरपीच्या स्पर्धेत टॉपची वाहिनी ठरली आहे. या वाहिनीच्या जवळपास सर्वच मालिका टॉप १५ च्या घरात आहेत. प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असलेल्या या वाहिनीवर लवकरच एक मालिका दाखल होत आहे.
‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही स्टार प्रवाहची आगामी मालिका आहे. या मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे ज्यात निवेदिता सराफ आणि मंगेश कदम प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत. आई बाबांच्या भूमिकेत या फ्रेश जोडीला पाहून प्रेक्षकांनी मालिकेबाबत उत्सुकता दाखवली आहे. आई बाबा त्यांच्या कामातून रिटायर्ड होऊन एक छानसं आयुष्य जगायचं स्वप्न पाहत असतात पण त्यांच्या मुलांचा संसार, त्यानंतर नातवंड यांना सांभाळत त्यांचेही आयुष्य असेच गुंतून राहते. त्यामुळे ते कामातून रियायर्ड जरी होत असले तरी घरच्या कामातून त्यांना मुळीच सुट्टी मिळत नाही हेच खरे.

नेमका हाच आशय घेऊन ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही मालिका स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे. या मालिकेत आणखी कोणकोणत्या कलाकारांना संधी मिळणार आहे हे लवकरच जाहीर केले जाईल. तूर्तास या नवीन मालिकेसाठी निवेदिता सराफ आणि मंगेश कदम यांचे प्रेक्षकांनी स्वागत केले आहे. या मालिकेत काहीतरी छान पाहायला मिळेल अशी एक आशा प्रेक्षकांनी व्यक्त केली आहे.