
झी मराठीवर लवकरच एक रिऍलिटी शो प्रसारित होणार आहे. ‘चल भावा सिटीत’ या रिऍलिटी शोमध्ये गावचा रांगडा गडी आणि शहरातली तरुणी अशी स्पर्धा रंगणार आहे. आता हा शो नेमका काय असणार हे येणाऱ्या दिवसातच स्पष्ट होईल. नुकताच या नवीन रिऍलिटी शोचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गायक , अभिनेते नागेश मोरवेकर यांनी या शोच्या शीर्षक गीताला आवाज दिला आहे. या गाण्यामुळे शोची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच या शोचे होस्टिंग कोण करणार हेही समोर आले आहे. ‘मी येतोय!’…असे म्हणत हा अभिनेता पाठमोरा दाखवण्यात आला आहे.
त्यामुळे हा नक्की कोण आहे? असे प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. याअगोदर झी मराठीचे शो निलेश साबळे आणि हार्दिक जोशी यांनी होस्ट केलेले आहेत. त्यामुळे बऱ्याच जणांनी या दोन नावांबद्दल हिंट दिली आहे. पण हा अभिनेता श्रेयस तळपदे असावा असा अंदाज जाणकार प्रेक्षकांकडून व्यक्त केला जात आहे. श्रेयस तळपदे यांनी माझी तुझी रेशीमगाठ या झी मराठीच्या मालिकेतून लोकप्रियता मिळवली होती. या मालिकेनंतर तो हिंदी चित्रपटात व्यस्त असलेला पाहायला मिळाला. माझी तुझी रेशीमगाठ नंतर झी मराठीवर ‘मी येतोय’ असे म्हणत तो ‘चल भावा सिटीत’ या शोला होस्ट करताना दिसणार आहे. त्यामुळे श्रेयस तळपदेचे चाहते त्याच्यासाठी उत्सुक असलेले पाहायला मिळत आहेत. शोच्या नवीन प्रोमोमध्ये तो पाठमोरा चालताना दिसतो आहे. त्याचे एकंदरीत हालचाल आणि केसांची स्टाईल पाहता हा श्रेयस तळपदेच आहे असा शिक्का त्याच्यावर दिला जात आहे.