natak

नाटक पाहायला आलेल्या व्यक्तीला नाटक इतकं आवडलं कि बक्षिस म्हणून दिलं तब्बल १ तोळा सोनं

मराठी रंगभूमी ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून, संस्कृती, परंपरा आणि आत्मसन्मानाचे प्रतीक आहे. या परंपरेचा एक मानबिंदू असलेले नाटक ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’ लवकरच आपल्या २५ व्या प्रयोगासाठी सज्ज होत आहे. मराठी संगीत रंगभूमीच्या सुवर्णकाळात ‘संगीत मानापमान’ हे नाटक गंधर्व नाटक मंडळी आणि ललित कलादर्श या दोन प्रतिष्ठित नाट्यसंस्थांमध्ये सादर होत असे. या दोन्ही संस्थांचे मालक– बालगंधर्व आणि संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी एकत्र येऊन एक ऐतिहासिक प्रयोग सादर केला, जो पुढे ‘संयुक्त मानापमान’ या नावाने अजरामर झाला. ही ऐतिहासिक घटना आणि त्यामागील कथा प्रेक्षकांसमोर उलगडणारे ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’ हे नाटक प्रेक्षकांना एका वेगळ्याच जादुई रंगभूमीच्या प्रवासाला घेऊन जाणार आहे.

goshtha sanyukt manapmanachi natak
goshtha sanyukt manapmanachi natak

या नाटकाचे लेखक अभिराम भडकमकर, दिग्दर्शक हृषिकेश जोशी असून निर्मिती श्यामराज पाटील आणि अनंत वसंत पणशीकर यांनी केली आहे. आशिष नेवाळकर, हृषिकेश वांबुरकर, ओंकार प्रभूघाटे, अजिंक्य पोंक्षे, श्यामराज पाटील, अशिनी जोशी, प्रद्युम्न गायकवाड परमेश्वर गुट्टे, ऋत्विज कुलकर्णी ,आशिष वझे, निरंजन जावीर, श्रीराम लोखंडे या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. ‘संगीत मानापमान’ नाटकाच्या पहिल्या प्रयोगाची तिसरी घंटा मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी दिली होती. याच परंपरेनुसार, ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’ नाटकाच्या तिसऱ्या घंटेसाठी वंदना गुप्ते, सुप्रिया पिळगांवकर, मोहन जोशी, रोहिणी हट्टंगडी, मकरंद देशपांडे, आनंद इंगळे, प्रवीण तरडे, उपेंद्र लिमये आणि अशा अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते. आतापर्यंत ४८ मान्यवरांनी ही परंपरा पुढे नेली असून, २५ व्या प्रयोगासाठी कोण तिसरी घंटा वाजवणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे!

gostha sanyukt manapmanachi marathi play drama
gostha sanyukt manapmanachi marathi play drama

तुडुंब गर्दीचा इतिहास!
त्या काळात नाटकांचं तिकिट चार आणेपासून सुरू व्हायचं ते ५ रुपयांपर्यंत असायचं. पण ‘संयुक्त मानापमान’ नाटकासाठी प्रेक्षकांची एवढी क्रेझ होती की १०० रुपये तिकीट लावूनही तो प्रयोग हाऊसफुल्ल झाला. प्रेक्षकांना उभं राहायलादेखील जागा नव्हती, एवढंच नव्हे तर प्रेक्षकागृहाबाहेरही फक्त गाणं ऐकता यावं यासाठी प्रेक्षक तात्कळत उभे राहिले होते. एवढी लोकप्रियता या संयुक्त मानापमान नाटकाने मिळवली होती.

रंगभूमीवरील अमूल्य बक्षीस – तोळाभर सोनं!
ही केवळ एक कलाकृती नव्हे, तर महाराष्ट्राच्या नाट्यसंस्कृतीतील एक सोनेरी पर्वणी आहे. ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’ नाटक शशिधर जोशी या नाट्यरसिकाला इतकं आवडलं की, त्यांनी कृतज्ञता म्हणून तोळाभर सोनं दिग्दर्शकाला बक्षीस म्हणून दिलं. १९२१ चा काळ आता अनुभवता येणं शक्य नाही.. पण या नाटकामुळे तो काळ अनुभवता आला यासाठी त्यांनी दिलेली ती कौतुकाची थाप होती. हा केवळ कलाकारांचा गौरव नव्हता, तर मराठी रंगभूमीवर सादर होणाऱ्या एका अविस्मरणीय कलाकृतीला मिळालेली उत्कृष्ट दाद होती.

२५ वा प्रयोग – एक ऐतिहासिक क्षण!
‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’चा २५ वा प्रयोग म्हणजे नाटकाच्या यशस्वी प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा. नाटकास मिळणाऱ्या उदंड प्रतिसादामुळे हा प्रयोग एक महोत्सव ठरणार आहे. मराठी नाट्यरसिकांनी हा ऐतिहासिक क्षण अनुभवावा आणि या भव्य प्रयोगाचा साक्षीदार व्हावे, हीच आग्रहाची विनंती!
गोष्ट संयुक्त मानापमानाची नाटकाचा रौप्यमहोत्सवी प्रयोग २ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वा. यशवंत नाट्यमंदिर , माटुंगा येथे
नक्की उपस्थित राहा आणि मराठी नाट्यपरंपरेतील या सुवर्णक्षणाचा आनंद घ्या!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button