गुरुवारी ४ जानेवारी २०२३ रोजी दुपारी ३ वाजता नाशिक मधील महाकवी कालिदास कलामंदिर येथे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली “सुविचार गौरव पुरस्कार सोहळा” पार पडला. गेल्या चार वर्षांपासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात येत आले आहे. या वर्षी पार्श्वगायक सुरेश वाडकर, अभिनेता गौरव चोपडा, अभिनेत्री अक्षया देवधर, अभिनेता हार्दिक जोशी, डॉ भाऊसाहेब मोरे( वैद्यकीय), डॉ शेफालीताई भुजबळ(शैक्षणिक) , श्रीमती संगीताताई बोरस्ते(कृषी), चंद्रशेखर सिंग(उद्योग), कु. गौरी घोटाळ(क्रीडा) , दत्ता पाटील (साहित्य), प्रा. नानासाहेब दाते (सहकार) अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सुविचार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तेव्हा मंचावर सुरेश वाडकर यांनी अजित पवार यांच्यासमोर एक खंत व्यक्त केलेली पाहायला मिळाली. सुरेश वाडकर यांना पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर मंचावर त्यांनी एक गाणं सादर केलं तेव्हा उपस्थितांनी शिट्ट्या वाजवून त्यांचं स्वागत केलं. ‘पण आजचं गाणं शिट्ट्या वाजवणारं नव्हतं, कोणत्या गाण्याला शिट्ट्या वाजवायच्या हे रसिकांना कळायला हवं’ असे म्हणत अजित पवारांनी उपस्थितांचे कान पिळले. यावेळी सुरेश वाडकर यांनी अजित पवारांसमोर ‘दादा मला वाचवा’ अशी हाक दिली. तेव्हा ते म्हणाले की, ” मला नाशिकमध्ये संगीत शाळा काढायची आहे. व्यवहाराचे ज्ञान नसल्याने माझी यात खूप मोठी फसवणूक झाली. दादांना ही गोष्ट माहीत आहे कारण त्यांनीच दोन तीन वेळेला त्या सरकारी अधिकाऱ्यांना दम दिला होता.
दादा तुमच्या सहकार्याने माझं ९० टक्के काम झालं आहे पण अजूनही १० टक्के काम होत नाहीये. हे माझं दुःख आहे. काका मला वाचवा असं आपण म्हणतो तसंच दादा मला वाचवा … तेव्हाच माझं हे स्वप्न पूर्ण होईल.” असे म्हणत सुरेश वाडकर यांनी अजित पवारांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. सुरेश वाडकर यांना नाशिकमध्ये संगीत विद्यालय सुरू करायचे आहे. पण गेली काही वर्षे हे काम रखडले आहे. ते कुठे अडकलय हे मला माहित नाही पण दादांनी मला या प्रकरणात सहकार्य करावे असे सुरेश वाडकर यांचे म्हणणे आहे.