सूरज चव्हाणच्या झापुक झुपुक चित्रपटाचा टिझर पाहिलात? माझ्यासारख्या माणसाचं तेच झालंय, येडा बनून जातेत लोकं आणि मी बनतो

मराठी बिग बॉस विजेता सूरज चव्हाण आता मोठा पडदा गाजवायला सज्ज झाला आहे. केदार शिंदे यांनी त्याला झापुक झुपुक चित्रपटातून प्रमुख भूमिका साकारण्याची संधी दिली. सोशल मीडिया स्टार असलेल्या सुरजला बोग बॉसच्या घरात असताना प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले होते. त्याचा साधा सरळ स्वभाव पाहून अनेकांची मनं त्याने जिंकली होती. बिग बॉसचा विजेता बनल्यानंतर त्याला अजित पवार यांच्याकडून घरही बांधून देण्यात येत आहे. बक्षिसांचा वर्षाव झालेला सूरज चव्हाण आता मनोरंजन विश्वातही मुख्य भूमिका साकारताना दिसणार. त्यामुळे सूरज स्वतःच आपल्या या चित्रपटासाठी खुप उत्साहित पाहायला मिळत आहे.
आज चित्रपटाचा टिझर लॉन्च होणार म्हणून कालच त्याने जेजुरीला जाऊन खंडोबाचे दर्शन घेतले होते. माझे चाहते माझा हा चित्रपट नक्कीच सुपर डुपर हिट करतील असा त्याला विश्वास आहे. झापुक झुपुक चित्रपटात प्रेक्षकांना काय बघायला मिळणार याची उत्सुकता या टिझरमधून समोर आली आहे. खरं तर ही सुरजचीच खऱ्या आयुष्यातील कथा आहे का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. कारण एका गरीब घरातला साधा मुलगा पण त्याला आसपासच्या सगळ्या मित्रांकडून धोका मिळतो. ‘येडा बनून जातेत लोकं आणि मी बनतो’…असा त्याचा एक डायलॉग टिझरमध्ये पाहायला मिळत आहे. लोकं आपल्या साधेपणाचा गैरफायदा घेतात आणि आपल्याला फसवतात अशा आशयाचे हे कथानक चित्रपट गृहात प्रेक्षकांना रडायला लावणार का? याचे उत्तर तुम्हाला २५ एप्रिल रोजीच उलगडणार आहे.

दरम्यान झापुक झुपुक चित्रपटाला मोठी स्टार कास्ट लाभली आहे. बिग बॉसच्या घरात असताना सुरजची भेट घेतली होती ती अभिनेत्री पायल जाधव हिने. सुरजला तिने भाऊ मानलं होत आणि सूरज या बहिणीच्या पाया देखील पडला होता. झापुक झुपुक चित्रपटात पायल जाधव त्याच्या बहिणीच्याच भूमिकेत पाहायला मिळणार आहे. याशिवाय मिलिंद गवळी, पुष्करराज चिरपुटकर, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, जुई भागवत, दीपाली पानसरे अशी स्टार कास्ट चित्रपटात पाहायला मिळणार आहे. केदार शिंदे या चित्रपटातबद्दल खूप आस लावून आहेत. प्रेक्षकांनी त्यांचा हात पाठीशी ठेवावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.