
झी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेने गेल्या काही दिवसांपासून चांगलीच पकड जमवली आहे. मालिकेचे प्रेक्षक पुन्हा एकदा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी कथानकात चांगलेच बदल केलेले पाहायला मिळत आहेत. अधिपती आणि अक्षराच्या लग्नानंतर ही मालिका थोडीशी रेंगाळलेली पाहायला मिळाली होती. मात्र आता अक्षराच्या धाडसी निर्णयामुळे आणि अधिपतीची तिला साथ मिळत असल्याने मालिका चांगलीच जम बसवताना दिसत आहे. त्यामुळे झी मराठीची ही एकमेव मालिका टीआरपीच्या स्पर्धेत टॉप १५ च्या यादीत प्रवेश करताना दिसत आहे. तर तिकडे ऑनलाइन टीआरपीच्या यादीत या मालिकेने ८ व्या क्रमांकावर नाव नोंदवले आहे. त्यामुळे झी मराठी वाहिनीला आपला घटलेला टीआरपी पुन्हा मिळवण्यासाठी या मालिकेची साथ मिळाली आहे.

अक्षरा आणि अधिपतीची भूमिका शिवानी रांगोळे आणि ऋषिकेश शेलार यांनी त्यांच्या अभिनयाने सहजसुंदर वठवल्या आहेत. तर भुवनेश्वरीची भूमिका कविता लाड यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने गाजवली आहे. मालिकेत इतके दिवस गप्प बसून असलेले चारुहास आता अक्षराच्या प्रयत्नामुळे बोलू लागले आहेत. त्यांना या आजारातून बरं करण्यासाठी अक्षराने चक्क भुवनेश्वरीशीच पंगा घेतला होता. मात्र मालिकेत आलेल्या एका ट्विस्टमुळे तिच्या या प्रयत्नांना खरे यश मिळालेले दिसून येत आहे. नुकत्याच एका प्रोमोमध्ये चारुहास भुवनेश्वरीच्या भूतकाळाचा उलगडा करणार आहेत. ते स्वतः चालत येऊन अक्षराशी स्पष्टपणे बोलताना दाखवले आहेत. भुवनेश्वरी कोण आहे याचा खुलासा ते अक्षराजवळ करत आहेत. भुवनेश्वरी ही चारुहास यांची पत्नी नसून तिने त्यांच्या पत्नीची जागा कशी बळकावली हे ते तिला सांगणार आहेत.
काही दिवसांपूर्वी भुवनेश्वरी अक्षरासोबत बोलताना म्हणाल्या होत्या की मी ह्या घरात २५ वर्षांचा संसार केलाय. तेव्हा अधिपतीचे वय २७ वर्षे असल्याचे तिने त्यांच्या लक्षात आणून दिले तेव्हा तुमचा संसार ३० वर्षांचा असेल असा अंदाज अक्षराने बांधला होता. तेव्हा भुवनेश्वरी थोडीशी गोंधळलेली पाहायला मिळाली होती. मात्र या २५ वर्षांचे गुपित नेमके काय आहे हे चारुहास कडूनच सगळ्यांना समजणार आहे. मालिकेतला हा ट्विस्ट पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक आहेत. भिवनेश्वरीचा भूतकाळ नेमका काय आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक या मालिकेकडे वळत आहेत. भुवनेश्वरीचं सत्य अक्षरासमोर आल्यानंतर ती तिला कसा धडा शिकवणार याची ही रंजक कहाणी पाहण्यास प्रेक्षक तेवढेच उत्सुक असणार आहेत.