काही अडचणीमुळे महाराज हॉटेल पुन्हा एकदा बंद…. अभिनेत्री सुप्रिया पाठारेच्या मुलाचं हॉटेल पुन्हा बंद
अभिनेत्री सुप्रिया पाठारे हिचा मुलगा मिहीर पाठारे याने ठाणे येथे पावभाजीचे एक हॉटेल सुरू केले होते. मात्र हे हॉटेल सध्या काही कारणास्तव पुन्हा एकदा बंद ठेवण्यात आलेले आहे. सुप्रिया पाठारे यांनी हे हॉटेल का बंद ठेवले आहे याचे कारण अद्याप सांगितलेले नाही मात्र हॉटेल अचानकपणे पुन्हा एकदा बंद असल्याचे पाहून खवय्यांनी पुन्हा एकदा काळजी व्यक्त केली होती. खरं तर काही दिवसांपूर्वीच सुप्रिया पाठारे यांच्या आईचे दुःखद निधन झाले होते. त्यामुळे दहा ते बारा दिवस त्यांनी महाराज हॉटेल बंद ठेवले होते. हॉटेल अचानकपणे बंद कसे झाले हे पाहून त्यांना असंख्य मेसेजेस आणि फोन कॉल्स येऊ लागले होते. तेव्हा सुप्रिया पाठारे यांनी आईच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर एका व्हिडीओ द्वारे सांगितली होती.
३ नोव्हेंबर रोजी हॉटेल पुन्हा सुरू करू असेही आश्वासन त्यांनी चाहत्यांना तसेच खवय्यांना दिले होते. सुप्रिया पाठारे यांनी हॉटेल का बंद केले म्हणून सेलिब्रिटी सुद्धा चिंतेत होते. अखेर आईच्या निधनानंतर सुप्रिया हॉटेल पुन्हा एकदा सुरू करणार अशी बातमी सुकन्या कुलकर्णी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या सोशल अकाउंटवर शेअर केली होती. सर्व काही सुरळीत सुरू असतानाच त्यानंतर आता पुन्हा एकदा सुप्रिया पाठारे यांचे हॉटेल बंद असल्याचे पाहायला मिळाले. यामुळेही त्यांना खवय्यांचे सतत मेसेजेस येऊ लागले आहेत. पण आता स्वतःच सुप्रिया पाठारे यांनी हॉटेल बंद असल्याची माहिती सोशल मीडियावर जाहीर केली आहे. “काही अडचणीमुळे महाराज आपलं बंद आहे, लवकरच खवय्येसाठी हजर होऊ स्वामी चरणी हीच प्रार्थना, भेटूया लवकरच” असे म्हणत महाराज हॉटेलमध्ये पावभाजी खातानाचा एक जुना व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे.
खेवरा सर्कल, रामजी हॉटेलच्या समोर ,ठाणे येथे सुप्रिया पाठारे यांच्या मुलाने हे पावभाजीचे सेंटर सुरू केले आहे. या हॉटेलमध्ये स्पेशल पावभाजी खाण्यासाठी आजवर अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. ठाण्यातील अनेक खवय्यांचे हे एक खास ठिकाण बनले आहे. हे हॉटेल सुरू करण्याअगोदर मिहिरने पावभाजीचा फिरता फूड ट्रक सुरू केला होता. पण हळूहळू या व्यवसायात जम बसल्याचे पाहून त्यांनी या फूड ट्रकचे हॉटेलच्या रुपात बदल केले. सुप्रिया पाठारे यांचा मुलगा मिहीर हा उत्तम शेफ आहे, परदेशात नामांकित हॉटेलमध्ये काही काळ काम केल्यानंतर तो मायदेशी परतला आणि स्वतःचा बिजनेस सुरू करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले. त्यात आई सुप्रियाची त्याला भक्कम साथ मिळाली. सुप्रिया पाठारे यांच्या लोकप्रियतेचा फायदा त्यालाही नक्कीच झालेला आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण दोनदा महाराज हॉटेल बंद असल्याचे पाहून अनेजण काळजी व्यक्त करताना दिसत आहेत.