मालिका सृष्टीत लोकप्रिय असलेली अभिनेत्री अक्षया नाईक सध्या फॅमिलीसोबत तिचा क्वालिटी टाइम स्पेन्ड करत आहे. सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेनंतर अक्षया चूक भूल द्यावी घ्यावी नाटकात तसेच एक लडकी को देखा तो या पॉकेट एफएमच्या सिरीजमध्ये पाहायला मिळाली. पण अक्षया अभिनेत्री म्हणून लोकप्रियता मिळवण्याअगोदर बलकलाकार म्हणून मराठी चित्रपटात झळकली होती हे क्वचित लोकांनाच ठाऊक आहे. पण अक्षयाच नाही तर तिची मोठी बहीण देखील एक बालकलाकार म्हणून नावारूपाला आलेली होती. अक्षता नाईक असं अक्षयाच्या मोठ्या बहिणीचं नाव आहे. अनेकदा या दोघी एकत्रित ट्रिप एन्जॉय करताना पाहायला मिळतात.
बहिणीसोबतचे अनेक फोटो, व्हिडीओ अक्षया तिच्या सोशल अकाउंटवर शेअर करत असते. अक्षयाचे वडील अरविंद नाईक हे निर्माते आहेत, त्यांनी १९९८ साली अशी ही ज्ञानेश्वरी या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटात त्यांनी त्यांची मोठी मुलगी अक्षता हिला बालकलाकार म्हणून अभिनयाची संधी देऊ केली. अशी ही ज्ञानेश्वरी या चित्रपटात रमेश भाटकर, निशिगंधा वाड प्रमुख भूमिकेत झळकले होते. तर कुलदीप पवार, सुहास पळशीकर, संभाजी शिंदे, नंदू जाधव, उषा नाईक, स्मिता ओक यांनी सहाय्यक भूमिका साकारल्या होत्या. तर अक्षताने ज्ञानेश्वरीची मुख्य भूमिका साकारली होती. चित्रपटानंतर अक्षताने कुठेही काम केले नसले तरी तिची बहीण मात्र हिंदी मालिका तसेच मराठी मालिकांत झळकली. सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेने अक्षयाला पहिल्यांदाच नायिकेची भूमिका देऊ केली.
खरं तर अक्षयाला बोडिशेमिंग वरून अनेकदा हिनवण्यात आले होते. यामुळे तिला कित्येकदा रिजेक्शनचा सामना करावा लागला होता. पण याच बेढब शरीराने तिला नायिकेची संधी मिळवून दिली. अक्षया आणि अक्षता या दोघींनी बालकलाकार म्हणून मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकलं पण पुढे जाऊन अक्षयाला अभिनय क्षेत्रातील मार्ग सापडत गेला. कल्चर किचन या नावाने तिचा खाद्यपदार्थांचा व्यवसाय आहे. त्यामुळे अभिनेत्री असण्यासोबत ती एक उद्योजिका देखील बनली आहे. तिच्या या कामात बहीण अक्षताची तिला नेहमीच साथ मिळत असते.