आदेश सोहमच्या मागे मुंडावळ्या घेऊन फिरतो दिसली मुलगी की…सोहमच्या लग्नाची आदेश बांदेकरांना चिंता
सध्या बांदेकर कुटुंब मनोरंजन विश्वात चांगली लोकप्रियता मिळवू लागलं आहे. होम मिनिस्टर या शोमुळे आदेश बांदेकर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचले. या शोने त्यांना केवळ लोकप्रियताच नाही तर आर्थिक स्थैर्य देखील मिळवून दिले असे म्हणायला हरकत नाही. त्याचमुळे बांदेकर कुटुंबाने मुलगा सोहमच्या नावाने प्रोडक्शन हाऊस उभारले. या निर्मिती संस्थेतून त्यांनी वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. ठरलं तर मग ही मालिका तर आता मराठी मालिकांमध्ये अव्वल ठरली आहे. याच जोडीला ते घरोघरी मातीच्या चुली ही आणखी एक नवी मालिका आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. तर कलर्स मराठी वाहिनीवर सुख कळले ही स्पृहा जोशी ची प्रमुख भूमिका असलेली मालिका ते लवकरच प्रेक्षकांसमोर आणत आहेत.
त्यामुळे बांदेकर प्रोडक्शन हाऊसची सगळीकडे वाहवा सुरू झालेली आहे. अशातच या निर्मिती संस्थेची संपूर्ण जबाबदारी सोहमने त्याच्या खांद्यावर पेलली आहे. त्यामुळे एक अभिनेता म्हणून मराठी इंडस्ट्रीत पदार्पण करणारा सोहम आता निर्माता बनून मालिकेच्या सेटवर खेळीमेळीचे वातावरण कसे तयार होईल याकडे लक्ष देऊन असतो. कलाकारांमध्ये जर छान बॉंडिंग असेल तरच मालिका लोकप्रिय होते हे त्याच्या यशा मागचं गमक आहे. अशातच घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या निमित्ताने सोहम बांदेकरच्या लग्नाचा विषय निघाला. सोहमच्या लग्नाचं टेन्शन कोणाला असतं? या प्रश्नावर सुचित्रा बांदेकर यांनी आदेश कडे बोट दाखवलं. “ह्याला फार वाटत असतं की एखादी सुंदर मुलगी दिसली की, ही कशी आहे? पण मग मी त्याला म्हणते की, अरे पण लग्न कोणाला करायचंय? सोहमला ना?. मग शोधू दे की त्याला, त्याने आणून दाखवली की मग आपण छान म्हणायचं.
यावर आदेश बांदेकर प्रतिक्रिया देतात की, “तो शोधत नाही , तो मूर्ख आहे”…सुचित्रा बांदेकर पुढे म्हणतात की, ” ती एक जाहिरात असते ना की, एक वडील जॉगिंगला जाणाऱ्या मुलाच्या मागे फोटो घेऊन फिरतो तसं आहे याचं. कुठली मुलगी दिसली की ही सोहमसाठी कशी दिसेल? उंची चांगली आहे. त्यामुळे आदेश सोहमच्या मागे मुंडावळ्या घेऊन फिरतो असं ते मला दिसत असतं.” अर्थात सोहमच्या लग्नाची काळजी आदेश बांदेकर यांना आहे कारण त्यांनी कॉलेजमध्ये असतानाच सुचित्राला लग्नासाठी पटवून ठेवले होते. पण आपल्या मुलाने अजूनही मुलगी शुधून ठेवली नाही ही खंत त्यांना सतावत आहे. यावर सोहमची प्रतिक्रिया देखील तेवढीच महत्वाची होती. तो म्हणतो की, “मला अगोदर माझं काम महत्वाचं वाटतं. हे मनोरंजन क्षेत्र आहे इथे ९ ते ५ असं काम नसतं. त्यामुळे मी दिवसभर खूप बिजी असतो. या गोष्टीला मी नकार नाही देत पण लवकरच माझे आणखी काही प्रोजेक्ट येत आहेत . आणि तसं पाहिलं तर माझं तेवढं वय देखील नाहीये.”