प्रतिभावंत ज्येष्ठ गायिका डॉ प्रभा अत्रे यांचे आज शनिवारी १३ जानेवारी रोजी पुण्यातील राहत्या घरी दुःखद निधन झाले आहे. त्या ९२ वर्षांच्या होत्या. आज पहाटे ३.३० च्या सुमारास त्यांना हृदविकाराचा झटका आला होता. त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले असल्याचे सांगण्यात आले. वयाच्या ९२ व्या वर्षी देखील त्यांनी आपली संगीताची कला जपली होती. आज ‘स्वरप्रभा’ या कार्यक्रमासाठी त्या पुण्याहून मुंबईला जाणार होत्या. मात्र त्यांच्या निधनाच्या बातमीने संगीत क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. डॉ प्रभा अत्रे यांच्या अमेरिका स्थित भाचीला ही बातमी कळवण्यात आली असून ती आल्यानंतरच मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्यदर्शनासाठीची वेळ त्यावरच ठरवण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे.
डॉ प्रभा अत्रे या बालवयातच गायनाचे धडे गिरवत होत्या. पुण्यातील आबासाहेब अत्रे आणि इंदिरा अत्रे यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. आबासाहेब अत्रे यांनी पुण्यात रास्तापेठ एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून मुलींसाठी शाळा सुरू केली होती. तर इंदिरा अत्रे या गायिका होत्या. आईच्या पावलावर पाऊल टाकत प्रभा अत्रे यांनी शास्त्रीय गायन क्षेत्राची वाट धरली. किराणा घराण्याच्या गायिका म्हणून त्यांनी ओळख जपली. संगीत शिकत असताना प्रभा अत्रे यांनी विज्ञान आणि कायद्याची पदवी प्राप्त केली होती. पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. हिंदुस्थानी गायन, भजन, अभंग या गायन प्रकारातून त्यांनी लोकप्रियता मिळवली आहे. स्वरमयी, स्वररंजनी, सुस्वराली, एनलायटनिंग द लिसनर अशी एकाच मंचावर संगीतावरील ११ पुस्तकं प्रकाशित करण्याचा विक्रम त्यांनी केला होता. प्रभा अत्रे यांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला तर त्यांनी विविध माध्यमातून काम केले होते.
त्यांनी आकाशवाणीसाठी संगीत विभागात निर्मात्या म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. तसेच आकाशवाणीच्या अ श्रेणीच्या कलाकार म्हणून त्यांनी काम केले होते. त्यांनी नेदरलँड, स्वीत्झर्लंड, कॅलिफोर्निया येथे संगीताच्या प्राध्यापिका म्हणून काम केले होते.स्वरश्री या ध्वनी मुद्रण कंपनीच्या मुख्य संगीत निर्मात्या तसेच दिग्दर्शिका म्हणून ततानी जबाबदारी सांभाळली होती. मुंबई केंद्रीय चित्रपट प्रमाण बोर्डाच्या सल्लागार समितीच्या त्या सदस्या होत्या. संगीत क्षेत्रात एवढा दांडगा अनुभव असलेल्या डॉ प्रभा अत्रे यांचे शिष्य देखील देशविदेशात नाव लौकिक मिळवत आहेत. त्यामुळे त्यांच्या निधनाच्या बातमीने संगीत विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. डॉ प्रभा अत्रे यांना आमच्या समूहाकडून भावपूर्ण श्रद्धांजली.