news

अभिनेता म्हणून मी कधीच यशस्वी ठरलो नाही पण आज म्हातारपणात केलेल्या ह्या व्यवसायामुळे मी करोडपती झालो

चंदेरी दुनियेत नशीब आजमावण्यासाठी आजवर अनेक कलाकारांनी मुंबई गाठली आहे. काहींना यात यश मिळाले तर काहींनी अपयश पचवून परतीचा मार्ग निवडला. ९० च्या दशकातील असाच एक अभिनेता आपले नशीब आजमावण्यासाठी मुंबईत दाखल झाला होता. मात्र ते अपयश सहन न झाल्याने तो आपल्या मूळ राज्यात परत जाऊन बिजनेसकडे वळला आणि बघता बघता कोट्यवधींचा मालक झाला. हा अभिनेता आहे शरद कपूर. आज शरद कपूरला पाहिलं तर हाच का तो? असा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात आला असेल. आजही तो बॉलिवूड चित्रपटात काम करतो मात्र सुरुवातीच्या काळात त्याने अभिनय क्षेत्र सोडून हॉटेल व्यवसायाकडे लक्ष केंद्रित केलं होतं. त्याच्या या यश अपयशाचा प्रवास नेमका कसा होता ते जाणून घेऊयात.

actor sharad kapoor
actor sharad kapoor

९० च्या दशकात अभिनय क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी शरद कपूर कलक्त्याहून मुंबईला दाखल झाला. लहानपणापासूनच त्याला चित्रपटाची आवड होती. कॉलेजला दांडी मारून तो चित्रपट पाहायला जात असे. कलकत्त्यात एक मोठा इव्हेंट आयोजित करण्यात आला होता या इव्हेंटमध्ये मोठमोठ्या कलाकारांनी हजेरी लावली होती. शरदने या इव्हेंटला आवर्जून उपस्थिती लावली आणि त्याचवेळी ठरवलं की आपणही यांच्यासारखच हिरो बनायचं. अभिनयाचा कुठलाही अनुभव नसताना तो मुंबईत आला. पण व्हायचं तेच झालं या क्षेत्रात काम मिळवण्यासाठी शरदला खूप खस्ता खाव्या लागल्या. चित्रपटात तर काम कारायचंय या विचाराने तो डायरेक्टरला साहाय्य करू लागला जेणेकरून सेटवर आल्यावर आपल्याला कोणीतरी काम देईल. पण अनेक दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करूनही शरदला अभिनेता बनता आलं नाही. शेवटी निराश होऊन तो पुन्हा कलकत्त्याला गेला. त्याच्या मित्रांनी त्याचा आत्मविश्वास वाढवला आणि मुख्य लोकांना भेट म्हणून एक सल्ला दिला. तेव्हा शरद पुन्हा मुंबईत आला इथे आल्यानंतर त्याने अनेक दिग्दर्शक, चॅनलवाल्यांच्या भेटी घेतल्या. त्याचदरम्यान त्याला स्वाभिमान मालिकेत काम करण्याची मोठी संधी मिळाली. अशाच आणखी काही मालिका केल्यानंतर शरदचे चित्रपटात काम करण्याचे स्वप्न साकार झाले . महेश भट यांनी दस्तक चित्रपटात शरदला प्रमुख भूमिका देऊ केली. हा चित्रपट फारसा चालला नसला तरी शरद ने त्यानंतर अनेक चित्रपट साइन केले. विश्वविधाता, आखों में तुम हो, तमन्ना अशा जवळपास १०, १२ चित्रपटात त्याने काम केले. पण एक अभिनेता म्हणून म्हणावे तसे यश त्याला मिळत नव्हते.

sharad kapoor with johny leaver
sharad kapoor with johny leaver

त्यानंतर शरदने सहाय्यक भूमिका आणि खलनायकाच्या भूमिकेकडे आपला मार्ग वळवला. मन्सूर खान यांच्या जोश चित्रपटात शरद ने खलनायक गाजवला. जानी दुष्मन, एक खिलाडी एक हसीना,क्यूँ की मै झूठ नहीं बोलता या चित्रपटानंतर शरदने अभिनय क्षेत्रातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आपल्या कुटुंबाकडे जाऊन तो पुन्हा कलकत्त्याला राहू लागला. तिथे गेल्यानंतर त्याने आपल्या दोन्ही भावांसोबत मिळून रेस्टॉरंट सुरू केले. या रेस्टॉरंटला भरपूर प्रतिसाद मिळू लागल्याने शरदचे नशीबच पालटले. त्याने मुंबईत आणि बंगलोरला देखील स्वतःचे रेस्टॉरंट सुरू केले. जे यश त्याला चित्रपटातून मिळत नव्हते ते यश त्याला एक व्यवसायिक बनून मिळू लागले होते. अशातच पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांची नात कोयल बसू सोबत त्याने लग्न केले. आज शरद कपूर यशस्वी उद्योजक बनून आपल्या कुटुंबासोबत कलकत्त्याला आरामात जीवन जगत आहे. कधी कधी तो चित्रपटातूनही छोट्या मोठ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेता म्हणून अपयशी ठरलेल्या शरदला यशस्वी हॉटेल व्यावसायिक म्हणून यश मिळत आहे आणि यातच तो समाधानी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button