आणि माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू आले माझ्या २ लेकरांनी … अविस्मरणीय अनुभवाने भारावल्या सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या
सिंधुताई सपकाळ यांच्या पश्चात त्यांच्या कार्याचा भार आता त्यांची कन्या ममता सपकाळ चालवतात. नुकतेच त्यांनी या संस्थेतील मुलांसोबत दिवाळीचा सण साजरा केला. पण आज भाऊबीजेच्या दिवशी त्यांना एक अविस्मरणीय अनुभव मिळाला. या अनुभवाने भारावलेल्या ममता ताई म्हणतात की, “कुठून सुरुवात करू ..कळत नाहीये. आजच्या दिवशी भगवंताने माझ्या झोळीत जो क्षण टाकलाय त्याने मी भरून पावले आहे. आनंदाने, समाधानाने मन काठोकाठ भराव आणि डोळ्यातून वाहू लागावं असच काहीसं आज माझ्या बाबतीत झालंय.
तर झालं असं की नेहमीप्रमाणे भाऊबीजेचा कार्यक्रम सुरू असताना माझ्या दोन लेकरांनी जे अगदी अलिकडेच जॉबला लागले आहेत त्यांनी अनपेक्षितपणे माझ्या हातात गिफ्ट ठेवलं. उघडून बघते तो काय दोन्ही बॉक्स मध्ये अतिशय सुंदर असं नाजूक काम केलेली साडी. मला काही सुचेना. कारण दोन्ही मुलं अस काही माझ्या हातात ठेवतील हे माझ्या ध्यानीमनीही नव्हतं. त्यात अजून एक पाकीट दिसलं म्हणून उघडून बघितलं तर संपूर्ण पगार त्यात ठेवला होता. मला रडू कोसळलं. मला झालेला आनंद डोळ्यातून घळा घळा वहायला लागला. काय काय आठवलं त्या एका क्षणात काय सांगू. ही इवलीशी चिमुरडी इतकी मोठी कशी झाली आणि हा इतका समंजसपणा कुठून आणि कधी आला काही काही आठवेना. आणि लक्ष समोरच्या आईच्या फोटोकडे गेलं.
आई झोक्यावर बसून मंद हसत आमच्याकडे बघत होती. मी रडता रडता हसत होते आणि तिला सांगत होते हे सगळं तुझं आहे आई. हे तू पेरलं आहेस आणि त्याची फळं माझ्या झोळीत आली आहेत. दोन्ही लेकरांना जवळ घेतलं आणि पगाराचं पाकीट ऑफीसमध्ये जमा केलं. मोठ्या दादाकडून सगळ्या लहान भावंडांना येत्या १४ नोव्हे. ला आईच्या वाढदिवसानिमित्त जेवण असणार आहे. तुम्हीही नक्की या.!.. मम्मा.. आज तू खूप खूप आठवलीस.!..”