
असं म्हणतात की कलाकारांमुळे त्यांच्या आईवडिलांना, भावंडांना ओळख मिळते पण सिध्दार्थच्या बाबतीत असे मुळीच म्हणता येणार नाही. अर्थात सिद्धार्थ जाधव हा मराठीसह बॉलिवूड सृष्टीतही ओळखला जातो यामुळे त्याचे या इंडस्ट्रीत एक मोठे नाव आहे. पण स्वतः सिध्दार्थच त्याच्या भावाच्या नावावरून ओळखला जातो हे विशेष. “ए तू डॉ लवेशचा भाऊ ना”…अशी त्याला आणखी एक वेगळी ओळख आहे, त्याला कारणही तसेच काही खास आहे. सिद्धार्थ त्याच्या भावाला देवमाणूस मानतो. कारण प्रत्येक दुःखातून, संकटातून बाहेर पडायचं असेल तर सिद्धार्थ त्याच्या भावाशी फक्त बोलतो आणि आयुष्यात चमत्कार घडावा असा त्यातून तो बाहेर पडतो. सिद्धार्थ जाधवच्या या भावाबद्दल जाणून तुम्हालादेखील नक्कीच त्याच कौतुक करावसं वाटेल. डॉ लवेश जाधव हे सिध्दार्थच्या मोठ्या भावाचं नाव आहे. लवेश जाधव शालेय शिक्षणातच खूप हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जात.

९० च्या दशकात तो ९ वी इयत्तेत शिकत असताना भारताकडून त्याला जपानला जाण्याची संधी मिळाली होती. जागतिक शांतता परिषदेत रीप्रेझेंट करायला देशातील ४ मुलांमध्ये त्याची निवड करण्यात आली होती. त्याकाळी क्रिकेटच्या टुर्नमेंटमध्ये तो इंग्लिशमध्ये कॉमेंट्री करायचा. पुढे मुंबई युनिव्हर्सिटीमधून त्याने एमबीबीएसचे शिक्षण घेतले. एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्याने बरेच वर्षे डॉक्टर म्हणून सेवा पुरवली. एखाद्या रुग्णाला कोणीच नातेवाईक नसेल तर फॉर्म भरताना तो स्वतःचे नाव लिहायला सांगायचा किंवा कोणाची आर्थिक परिस्थिती नसेल तर त्यांचे उपचार तो स्वतःच्या बळावर करायचा. त्यामुळे डॉ लवेश जाधव हे व्यक्तिमत्व केवळ सिद्धार्थ साठीच नाही तर सर्वसामान्य लोकांसाठी देवमाणूस म्हणून ओळखले जाऊ लागले. उत्तम वक्ता, प्रेरणादायी व्यक्तिमत्व , विनोदी अंग अशीही लवेश जाधवची ओळख आहे. डॉ लवेश रामचंद्र जाधव हे एक प्रसिद्ध आणि बहुआयामी व्यक्तिमत्व आहेत. “मीरा क्लिनफुएल्स लिमिटेड MCL” या कंपनीची त्याने स्थापना केली आहे. मुंबई विद्यापीठातून एमबीबीएस आणि इमर्जन्सी मेडिसिन (इंडो-यूएस फेलोशिप) AIIMS, दिल्ली येथे त्याने पोस्ट ग्रॅज्युएट फेलोशिप पूर्ण केली आहे. महाराष्ट्रसह गुजरात, कर्नाटक आंध्र प्रदेश आणि भारताच्या उर्वरित भागात बायोइंधन प्रकल्प विस्तारण्याचा त्याचा मानस आहे.

जट्रोफा प्लांटेशन, बायोडिझेल उत्पादन प्रकल्पांसह मोठ्या प्रमाणावर जैवइंधन प्रकल्पांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्याचा १८ वर्षांपेक्षा जास्त अनुभव त्याला आहे. कचऱ्यापासून स्वच्छ इंधन प्रकल्प विकसित करण्यात तो गुंतलेला आहे. असे प्रकल्प सुरू करण्यासाठी विविध नगरपरिषद आणि जिल्हा प्रशासन यांच्याशी संपर्क साधून ते काम करत आहेत. त्यांनी गेल्या दशकापासून जैवइंधन अवकाश आणि पर्यावरण क्षेत्रात काम केले आहे. तो केवळ वैद्यकीय पदवीधर नाही तर अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक म्हणून मनोरंजन क्षेत्रातही कार्यरत आहे. पश्चिम भारतातील जैवइंधन उद्योग क्षेत्रात कोण कोण सहभागी आहे त्यांच्या तो नेहमीच संपर्कात राहण्यासाठी प्रयत्नशील असतो. उत्स्फूर्त स्वभाव, साधेपणा, परिस्थितीप्रती सकारात्मकता आणि जे योग्य आहे त्यासाठी उभे राहणे यामुळे अनेकांना त्याच्याकडे पाहून प्रेरणा मिळत असते.