पुणे नाशिक रोडला ट्राफिक पोलिसांनी उगाचच अडवलं…अजब उत्तर ऐकून अभिनेत्रीने व्हिडिओ काढायला सुरवात करताच

आज सकाळीच अभिनेत्री श्वेता मेहेंदळे तिच्या कामानिमित्त पुणे नाशिक रोडवर प्रवास करत होती. पण एका ठिकाणी पोलिसांनी तिची गाडी अडवली. गाडी का अडवली? त्याचं कारण काय? म्हणून तिने पोलिसांना प्रश्न विचारला. बऱ्याच वेळानंतर पोलिसांनी तिला उत्तर दिले की , “दंड आहे की नाही ते बघतो….तुमच्या गाडीला कुठला दंड आहे का ते आम्हाला चेक करायचंय”…यावर श्वेता मेहंदळेने मोबाईलवर व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली.
ते पाहून पोलिसांनी तिला जाण्याची परवानगी दिली. आता यावर श्वेता मेहेंदळेने प्रश्न उपस्थित केला आहे. “या देशाचा नागरिक म्हणून कुठलंही संभाव्य कारण नसताना आम्हाला असं का थांबवलं गेलं?. आपण गाडी विकत घेताना टॅक्स भरतो , रोड टॅक्स देखील भरतो. आपल्याला रस्ते चांगले देणार म्हणून रोड टॅक्स भरतो, ते रस्ते चांगले नसतात. मग ते म्हणतात आम्ही वेगळे रस्ते बांधू…त्या रस्त्याने तुमचा वेळ वाचेल, त्यासाठी तुम्ही टोल भरा. तो वेळ वाचण्यासाठी आपण टोलही भरतो.
पण पुढे आल्यानंतर हे पोलीस आपल्याला रस्त्यात अडवतात आणि आपला वेळ खातात. आता मला सांगा उद्या आपल्या ह्या वेळेवरती आणि जगण्यावरतीही टॅक्स लागणार का ?. कारण तुम्हाला एवढं सुखकर जगायचं असेल तर तुम्हाला हा टॅक्स भरावा लागेल, ही वेळ आपल्यावर येणार आहे. कुठलंही कारण नसताना आपल्याला असं का वागवलं जातं? असं का थांबवलं जातं रस्त्यात?.” असा प्रश्न तिने सोशल मीडियावर उपस्थित केला आहे.