झी मराठी वाहिनीने नेहमीच दर्जेदार मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. आभाळमाया मालिकेपासून सुरू झालेला हा प्रवास आजतागायत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसला आहे. या वाहिनीने केवळ प्रेक्षकांचे मनोरंजनच केले असे नाही तर नवोदित कलाकारांनाही प्रसिद्धीच्या झोतात आणले. त्यामुळे प्रेक्षक आणि कलाकार यांच्यात एक अतूट नातं तयार झालं आहे. पण आता बदलत्या काळानुसार नवनवीन धाटणीच्या मालिकांनी जागा पकडली आहे त्यामुळे जुने जाणते प्रेक्षक अनेकदा या जुन्या मालिका पुन्हा बघायला मिळायला हव्यात अशी मागणी करताना दिसले.
अर्थात या जुन्या मालिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत त्यामुळे या मालिका बघायला मिळण्यासाठी युट्युबवर शोधकार्य सुरू असते. पण काही कारणास्तव बऱ्याच मालिकांचे एपिसोड कुठेच पाहायला मिळत नसल्याने निराशा होते. पण आता प्रेक्षकांच्या आग्रहाखातर या जुन्या मालिका आणि तेही अगदी जाहिराती ब्रेक शिवाय तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. झी मराठीने हा एक मोठा निर्णय घेतला असल्याने त्याचे प्रेक्षकांकडून स्वागतच होत आहे. दरम्यान या मालिका तुम्हाला १२१४ या नंबरच्या ‘मराठी क्लासिक्स’ या चॅनलवर पाहायला मिळणार आहे.
टाटा प्ले तर्फे ५ दिवस या मालिका तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहेत. या चॅनलवर दररोज संध्याकाळी ६ वाजता श्रीयुत गंगाधर टिपरे ही मालिका प्रसारित होणार आहे. याशिवाय आणखी काही गाजलेल्या जुन्या मालिका, कीर्तन आणि अविस्मरणीय मराठी चित्रपट देखील पहायला मिळणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांचेही आता १०० टक्के मनोरंजन होणार आहे.