अभिनय क्षेत्राच्या जोडीलाच कलाकार मंडळी हॉटेल व्यवसायाकडे वळली आहेत. लॉकडाऊनच्या काळानंतर प्रत्येक कलाकाराला या व्यवसायाची गरज प्रकर्षाने जाणवू लागली. जोपर्यंत अभिनय क्षेत्रात काम मिळते तोपर्यंत त्यातून मिळणारा पैसा हा योग्य मार्गी लावला जावा या इच्छेने ही कलाकार मंडळी हॉटेल व्यवसाय सुरू करू लागली आहेत. आई कुठे काय करते फेम निरंजन कुलकर्णी, नम्रता प्रधान, अनघा अतुल या छोट्या पडद्यावरच्या कलाकारांनी स्वतःचे रेस्टोरंट सुरू करून या यादीत भर टाकली. आता या पाठोपाठ अभिनेत्री श्रेया बुगडे हिने देखील काल २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने स्वतःचे रेस्टोरंट सुरू केलेले पाहायला मिळाले. “Big Fish” या नावाने श्रेयाने शिवसेना भवन मार्ग, शिवजीपार्क, दादर पश्चिम येथे सी फूड मिळणारे रेस्टोरंट सुरू केले आहे. श्रेया बुगडे आणि तिची खास मैत्रीण उज्वल सामंत या दोघींनी मिळून हे रेस्टोरंट उभारले आहे.
उज्वल सामंत हिचा साड्यांचा व्यवसाय आहे. त्याच्या हँडलूमच्या साड्यांची मॉडेल ही श्रेया बुगडे असते त्यामुळे या दोघींमध्ये छान बबॉंडिंग जुळलेले आहे. याच एका विचाराने दोघींनी हॉटेल व्यवसायात पाऊल टाकण्याचे ठरवले. बीग फिश या त्यांच्या रेस्टोरंटचे इंटेरिअर खूपच आकर्षक रंगानी सजवलेले तुम्हाला पाहायला मिळेल. इंटेरिअर साठी व्हाइट आणि ब्राऊन रंगाच्या थीमला प्राधान्य देण्यात आले आहे. याशिवाय तांबे आणि पितळेच्या भांड्यानी भिंतीच्या कप्प्यात आकर्षक सजावट केलेली आहे. काल शुक्रवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून श्रेयाने या नव्या प्रवासाला सुरुवात केली. यावेळी सुकन्या मोने, संजय मोने, हर्षदा खानविलकर, संजय जाधव या सेलिब्रिटींनी हजेरी लावून श्रेया आणि उज्वलला या व्यवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या शोमुळे श्रेया बुगडेला मोठी प्रसिद्धी मिळाली. मिमिक्री आर्टिस्ट अशीही तिची ओळख आहे. गेली नऊ वर्षे चला हवा येऊ द्या शोने यातील कलाकारांना आर्थिक दृष्ट्या स्थिरस्थावर केलेले आहे. पण गेल्या काही दिवसांपासून हा शो बंद होणार अशी एक चर्चा झाली होती. अजूनही तग धरून असलेला हा शो आणखी किती दिवस राहील याची शाश्वती न मिळाल्याने कदाचित श्रेयाने या नवीन व्यवसायाची वाट धरली का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण अभिनय क्षेत्रावर विसंबून न राहण्यापेक्षा नवनवीन काहीतरी करत राहावे यातच खरे शहाणपण आहे. तूर्तास श्रेया बुगडेला हॉटेल व्यवसायात पदार्पणासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.