सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शुक्रवारी रात्री अखील भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांकडून ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचं वृत्त व्हायरल झालं होतं. २ फेब्रुवारी रोजी सावित्रीबाई फुले विद्यापीठात चार नाटकांचे प्रयोग आयोजित करण्यात आले होते. २०० ते २५० प्रेक्षकांच्या उपस्थितीत हे प्रयोग पार पडले. दोन नाटकाच्या प्रयोगानंतर तिसरे नाटक ललित कला केंद्र मधील विद्यार्थी सादर करणार होते. या विद्यार्थ्यांनी रामलीलावर एक व्यंगात्मक नाटक सादर केलं होतं. त्यात सीता मातेला सिगारेट ओढताना दाखवण्यात आले होते याशिवाय सीतामातेच्या भूमिकेत असलेला मुलगा अर्वाच्य भाषेत शिव्या देऊ लागला.
तर श्री लक्ष्मण रावणाची मालिश करताना त्यात दाखवण्यात आले. या नाटकात प्रभू श्रीरामाचा एकेरी उल्लेख करण्यात आला होता. याशिवाय श्रीरामाची तुलना राखी सावंत सोबत करण्यात आली होती. सदर नाटक हे हिंदू देवतांचा अपमान करणारे दिसत होते. या नाटकाच्या सादरीकणाचे काही व्हिडीओ उपस्थितांनी आपल्या मोबाईलमध्ये शूट केले होते. नाटकातील आक्षेपार्ह घटना या समस्त हिंदूंच्या भावना दुखावणाऱ्या होत्या. या नाटकाचा निषेध नोंदवत त्यातील कलाकारांना मारहाण करण्यात आली होती. या नाटकाला परवानगी देणारे ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख डॉ प्रवीण काळे, लेखक भावेश पाटील तसेच नाटकात काम करणारे कलाकार यांच्याविरोधात कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे. नाटकात आक्षेपार्ह विधानं असतानाही त्याला परवानगी कशी देण्यात आली असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. नाटकात काम करणारे जय पेढणेकर, प्रथमेश सावंत, ऋषिकेश दळवी, यश चिखले आणि इतर विद्यार्थी यांनी ज्या दृष्ट भावनेने हे नाटक सादर केले त्यामुळे हिंदूंच्या भावना त्यांनी दुखावण्याचे काम केले आहे.
यामुळे या विद्यार्थ्यांना मारहाण करत त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मराठी सृष्टीतही या विरोधात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. संबंधीत विद्यार्थ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी कलाकारांकडून करण्यात येत आहे. दरम्यान हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याच्या आरोपावरून पोलिसांनी ललित कला केंद्राचे विभागप्रमुख डॉ. प्रवीण भोळे आणि विद्यार्थी भावेश पाटील, जय पेडणेकर, प्रथमेश सावंत, ऋषिकेश दळवी आणि यश चिखले यांना अटक केली आहे.