तू तिला प्लॉट मिळवून दिला तर तुझ्या मानेवरून सुरी फिरवेल मी….रोखठोक सविता मालपेकरांनी मोहन जोशी यांचा घेतला होता समाचार
आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सविता मालपेकर यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. त्यात त्यांनी कलाकारांच्या, तसेच बॅक आर्टिस्टच्या बाजूने मत मांडलं आहे. आज काम केलं की त्याचे पैसे तुम्हाला संध्याकाळी द्यायला हवेत . तीन चार महिन्यानंतर जर निर्माता तुम्हाला पैसे देत असेल तर हातावर पोट असणाऱ्या लोकांनी त्यांचं घर कसं चालवायचं? ही खंत त्यांनी इथे बोलून दाखवली आहे. मी जर निर्माती झाले तर मी कलाकारांचे पैसे त्याच दिवशी देऊ शकेल एवढं मला मोठं कर अशी मी स्वामींना प्रार्थना करत असते, असे सविता मालपेकर म्हणतात. कलाकारांना, बॅक आर्टिस्टना शासनाच्या १० टक्के कोट्यातून घर मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न देखील केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेणाऱ्या सविता मालपेकर यांनी याच कारणासाठी राजकारणात प्रवेश केला. सांस्कृतिक विभागाच्या त्या सरचिटणीस आहेत.
नाट्यपरिषदेत कार्यकारिणी म्हणूनही त्या पदभार सांभाळत आहेत. मराठी इंडस्ट्रीला उद्योजकाचा दर्जा नाही तो मिळावा म्हणून त्या प्रयत्नशील आहेत. पण शासन दरबारी हुजरेगिरी करणाऱ्या व्यक्तींची कामं करून दिली जातात त्यामुळे बरीचशी खऱ्या लोकांची कामं अडून राहतात. कलाकारांना कमी पैशांत घरं मिळवून देण्याबाबत मुलाखतकार अमृता राव यांनी तर एक वेगळाच खुलासा केला. “मी २४ वर्षे दूरदर्शनवर बातम्या दिल्या, त्यावेळी अनेक न्यूजरिडरने स्वतःची घरं असून सुद्धा नेतेमंडळींच्या ओळखीने १० टक्के कोट्यातून दोन दोन तीन तीन फ्लॅट घेतले, तेही अवघ्या १ लाख २० हजार रुपयांमध्ये. हाच मुद्दा घेऊन सविता मालपेकर यांनी मोहन जोशींचा एक किस्सा सांगितला की ” आम्ही कलाकारांसाठी प्लॉट मिळावेत म्हणून प्रयत्न करत होतो. मोहन जोशी १३ वर्षे नाट्यपरिषदेचे अध्यक्ष होते. या मितीपर्यंत आम्हाला प्लॉट मिळाला नाहीये. बऱ्याच कलाकारांनी मोहन जोशीकडे नावं दिली. त्यातला एक कलाकार जे दोघेही नवरा बायको या इंडस्ट्रीत काम करत आहेत. दोघांपैकी एकाच्या नावाने घर असेल तर त्याला प्लॉट दिला जात नाही.
पण तिने मोहन जोशींकडे तो प्लॉट मिळावा म्हणून मागणी केली. तेव्हा मी मोहन जोशींना सांगितलं होतं की, आपल्याला प्लॉट मिळाला आणि ह्या व्यक्तीला तू घर दिलंस तर तुझ्या मानेवरून सुरी फिरवेल मी… त्या व्यक्तीने माझ्याकडे फ्लॅट नसल्याचे सांगितले , तेव्हा मी मोहन जोशींना तिच्या त्या घराच्या नंबर सहित संपूर्ण पत्ता सांगितला. ह्या लोकांची हिम्मत कशी होते? उलट त्यांनी असं म्हणायला हवं की ह्या व्यक्तीला त्याची गरज आहे तर ते त्याला मिळू दे असे म्हटले पाहिजे. पण प्रत्येकजण मी ह्याचा अध्यक्ष आहे त्याचा अध्यक्ष आहे असे म्हणतो पण तळागाळातल्या टेक्निशियन लोकांचाही तुम्ही विचार करायला हवा”.