झी मराठीवरील सावळ्याची जणू सावली ही मालिका एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. सावलीसोबत लग्न झालं म्हणून सारंग कायम निराशेच्या छायेत वावरत होता. पण जसा तो सावलीच्या माहेरी गेला तसा तो सावलीला जवळून ओळखू लागला. गावातील लोक सावलीला आदर देतात, तिच्या कामाचं कौतुक करतात ते पाहून सरंगच्याही मनात तिच्याबद्दल सकारात्मक भावना निर्माण झाल्या आहेत. सावलीला अजून त्याने पत्नी म्हणून स्वीकारले नसले तरी तिच्याबद्दल आता त्याला आपलेपणा वाटू लागला आहे. अशातच गावकऱ्यांना सारंगने १० लाखांची मदत देऊ केली आहे.
पण आता सारंगवर कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला आहे. याची चाहूल सावलीला लागली असताना ती मध्येच गाणं सोडून सारंगच्या मदतीला जाण्यासाठी तयार होते. पण भैरविला दिलेल्या शब्दामुळे ती हतबल होते. आता विठुरायानेच सारंगला वाचवावे म्हणून ती त्याचा धावा करत आहे. अशातच देवा नावाची व्यक्ती सारंगच्या मदतीला धावून आलेली पाहायला मिळते. हा देवा पोलीस असून ही भूमिका कोण साकारणार याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. देवाची भूमिका अभिनेता निषाद भोईर साकारणार असल्याचे आता समोर आले आहे.
निषाद भोईर याने या अगोदर दख्खनचा राजा जोतिबा, निवेदिता माझी ताई तसेच आशीर्वाद तुझा एकविरा आई या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. नुकत्याच रंगभूमीवर आलेल्या पुरुष या नाटकातही निषाद काम करत आहे. आता महेश कोठारे यांच्या सावळ्याची जणू सावली मालिकेत तो देवाची भूमिका साकारत आहे. हा देवा सावली आणि सारंगच्या आयुष्यात येऊन त्यांना आणखी जवळ आणणार की त्यांच्या नात्यात दुरावा आणणार हे लवकरच स्पष्ट होईल.