मनोज जरांगे पाटील यांच्यावर आधिरीत चित्रपटात छगन भुजबळ आणि गुणरत्न सदावर्ते यांची भूमिका साकारणारे कलाकार आहेत तरी कोण
येत्या १४ जून रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित ” संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील” हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे अहोरात्र झटत आहे. त्यांच्या याच संघर्षाची कहाणी तुम्हाला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अभिनेते रोहन पाटील मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारत आहे. तर त्यांच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री सुरभी हांडे साकारत आहे. भली मोठी स्टार कास्ट लाभल्याने अनेक छोट्या मोठ्या कलाकारांना या चित्रपटात झळकण्याची संधी मिळाली आहे. दिग्दर्शक शिवाजी दोलताडे आणि गोवर्धन दोलताडे यांनी हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणण्याचे धाडस दाखवले आहे.
नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यात गुणरत्न सदावर्ते आणि छगन भुजबळ यांचीही झलक पाहायला मिळत आहे. या दोघांनीही मराठा आरक्षणाला तीव्र विरोध दर्शवला होता. त्यामुळे त्यांचा विरोध कसा होता हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचीही झलक या ट्रेलर मध्ये पाहायला मिळाली. पण छगन भुजबळ आणि गुणरत्न सदावर्ते यांच्या भूमिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलेले पाहायला मिळते. या भूमिका कोणी साकारल्या याबद्दलही कुतूहल निर्माण झाले आहे. गुणरत्न सदावर्ते यांची भूमिका चित्रपटाचेच दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी साकारली आहे. दिसायला सेम असल्याने ते या भूमिकेत अगदी चपखल बसले आहेत. तर छगन भुजबळ यांची भूमिका प्रसिद्ध अभिनेते संजय कुलकर्णी यांनी साकारलेली आहे. संजय कुलकर्णी यांनी आजवर अनेक भूमिकेतून प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे.
पण छगन भुजबळ यांच्या भूमिकेतही ते अगदी चपखल बसलेत असे मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील वाद या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. जरांगे पाटील यांची रोखठोक भूमिका रोहन पाटील यांच्या अभिनयाने सजग झाली आहे. त्यामुळे अनेकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुकता दर्शवली आहे. दरम्यान हा चित्रपट लोकांना मोफत बघता यावा म्हणून एका व्यक्तीने संपूर्ण थिएटरच बुक केले आहे. नाशिक मधील वणी येथील लक्ष्मी टॉकीजमध्ये १४ जून रोजी रात्री ८ वाजता होणाऱ्या या शोला प्रेक्षकांनी हजर राहावे हाच यामागचा उद्देश आहे. समाज बांधवांना हा चित्रपट मोफत बघता यावा म्हणून कोणीतर अज्ञात व्यक्तीने हे थिएटर बुक केलेलं आहे.