महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोने अनेक कलाकार घडवले आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून या शोला एक गळती लागलेली आहे. सुरुवातीला विशाखा सुभेदार, पंढरीनाथ कांबळे या कलाकारांनी महाराष्ट्राची हास्यजत्रामधून काढता पाय घेतला. खरं तर अभिनयातला तोच तोच पणा त्यांना नको होता. त्यामुळे विशाखा सुभेदार यांनी हास्यजत्रा सोडून नाटकाकडे वळण्याचा निर्णय घेतला. तिच्या पाठोपाठ ओंकार भोजने सारख्या हरहुन्नरी कलाकाराने या शोमधून एक्झिट घेतली. तर काही दिवसांपूर्वीच गौरव मोरेने देखील या शोला रामराम ठोकला. नव्या संधी मिळत असल्याने या कलाकारांनी शो सोडण्याचे कारण सांगितले होते. पण आता लवकरच समीर चौघुले हे देखील हास्यजत्रामधून काढता पाय घेतात की काय असेच चित्र आता समोर आले आहे. कारण नुकतेच समीर चौघुले यांनी त्यांच्या नव्या शोची घोषणा केली आहे. त्यामुळे इथून पुढचे काही दिवस तरी समीर चौघुले हास्यजत्रामध्ये दिसणार नाहीत असेच म्हणावे लागेल. अर्थात या नवीन संधीमुळे ते या शोतून कायमचा काढता पाय तर घेणार नाहीत ना असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांनी उपस्थित केला आहे.
समीर चौघुले हे “सम्या सम्या मैफिलीत माझ्या” या नवीन एकपात्री कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दीड तास चालणाऱ्या या कार्यक्रमात अनेक धमाल किस्से आणि गप्पा मनोरंजनात्मक कथाकथन तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. या नवीन शोबद्दल समीर चौघुले म्हणतात की, ….“सम्या सम्या मैफिलीत माझ्या” …समीर चौघुले ” …….प्रेम हे ट्रेनमध्ये चढताना हुकलेल्या संधीसारखं असत, जे संधीच सोनं करतात त्याना संसाराची विंडोसीट मिळते.. तर काही जणांच्या मते प्रेम हे प्राजक्ताच्या सड्यासारखं असत जे नेहेमी पायदळी तुडवलं जातं….तर काही जणांच्या मते खरं प्रेम म्हणजे “एखाद जुनं पुस्तक चाळताना सापडलेलं मोराचं पीस”…लग्न म्हणजे काय यावर कोणीतरी म्हटलंय “साबणाची संपत आलेली जुनी वडी नव्या कोऱ्या साबणाला चिकटवणे आणि साबण मोठा करून पुढील अंघोळ करणे”…काही जणांच्या मते लग्न म्हणजे “मुंडावळ्या बांधून वाजत गाजत संसाराच्या बाईकवर बसून ‘मौत का कुव्वा’ मध्ये उडी मारणे” …..वगैरे वगैरे….‘प्रेम’ आणि ‘लग्न’ यांच्या जगभरात वगवेगळ्या व्याख्या आहेत.
रसिक हो…यातली नेमकी तुमची व्याख्या कोणती? सांगता येईल?…चला जाणून घेऊया….आयुष्यात सुखी होण्यासाठी गुदगुल्या करणाऱ्या, मजेशीर, हास्य कल्लोळ उसळवणाऱ्या महत्वाच्या टिप्स घेऊन येतायत सदाबहार युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक आणि सुप्रसिद्ध अभिनेता लेखक समीर चौघुले..एक नवा कोराकरकरीत एकपात्री कथा कथनाचा कार्यक्रम घेऊन “सम्या सम्या मैफिलीत माझ्या”………हसतखेळत गुदगुल्या करत आपल्याला आपलाच आरसा दाखवणाऱ्या धम्माल विनोदांची भेळ म्हणजेचं…….. “सम्या सम्या मैफिलीत माझ्या”….सम्याच्या मैफिलीत तुमचं स्वागत आहे.” समीर चौघुले यांनी या नव्या शोची घोषणा करताच त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. पण या शोमुळे ते हास्यजत्रेत दिसणार नाहीत याचीही खंत व्यक्त करण्यात येत आहे. हास्यजत्रेचे कलाकार नवीन काहितरी शोधण्याच्या भानगडीत जुन्याला विसरून तर नाही ना जाणार अशी एक चर्चा सुरू आहे.