मी माझ्या मुलाला सर्वकाही देऊन ‘मूर्ख’ पणा केला… चुकून माझ्याकडे काही पैसे राहिले होते जे मी
रेमंडचे प्रसिद्ध उद्योजक विजयपत सिंघानिया यांनी २०१५ मध्ये त्यांच्या कंपनीचे सर्व अधिकार मुलगा गौतम सिंघानिया याच्याकडे सुपूर्द केले होते. त्यानंतर लगेचच गौतम सिंघानिया याने २०१७ मध्ये विजयपत सिंघानिया यांना दक्षिण मुंबईतील त्यांच्या जेके हाऊस इमारतीतून हाकलून दिले. ही बातमी उद्योग विश्वाला हादरवणारी ठरली होती. तर काही दिवसांपूर्वीच गौतम सिंघानिया यांची विभक्त पत्नी नवाज मोदी सिंघानिया यांनीही शारीरिक शोषणाचा आरोप केला होता. गौतम सिंघानिया यांच्या पत्नीने कथितपणे त्यांच्या १.४ अब्ज डॉलर संपत्तीपैकी ७५ टक्के रक्कम स्वत:साठी आणि तिच्या दोन मुली निहारिका आणि निसा दोघींसाठी द्यावी अशी मागणी केली होती. घटस्फोटानंतर त्यांनी ही मागण केली होती.
यानंतर विजयपत सिंघानिया यांनी मीडियाला एक विशेष मुलाखत दिली आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की, ” पालकांनी मुलांना सर्व काही नावावर करून देण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार केला पाहिजे, मी माझ्या मुलाला सर्वकाही देऊन ‘मूर्ख’ पणा केला आहे .” अशी खंत विजयपत यांनी व्यक्त केली आहे. विजयपत सिंघानिया पुढे असेही म्हणाले की, “गौतमने कंपनीचे काही भाग देण्यास सहमती दर्शवली होती, परंतु नंतर तो मागे हटला. माझ्याकडे कुठलेही काम नव्हते म्हणून मग त्याने मला कंपनीचे काही भाग देण्याचे मान्य केले होते, परंतु त्यानंतर त्याने ते देण्यास अमान्य केले. माझ्याकडे आता अर्थार्जनासाठी दुसरे काहीही मार्ग नाहीत. मी त्याला सर्व काही दिले होते त्यातील चुकून माझ्याकडे काही पैसे राहिले होते जे मी आजपर्यंत सांभाळून ठेवले आहेत.
ते पैसे नसते तर आज मी रस्त्यावर आलो असतो”. विजयपत सिंगानिया म्हणतात की “गौतमला रस्त्यावर पाहून मला आनंद होईल. मला याची खात्री आहे की जर तो आपल्या पत्नीला अशा प्रकारे घराबाहेर काढू शकतो, तर तो त्याच्या वडिलांनाही अशा प्रकारे बाहेर काढू शकतो. कारण तो काय आहे हे मला माहित आहे”. सोमवारी, १३ नोव्हेंबर रोजी गौतम सिंघानिया यांनी पत्नी नवाजपासून विभक्त झाल्याचे जाहीर केले होते. आठ वर्षे रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर १९९९ साली गौतम सिंघानिया आणि नवाज मोदी विवाहबद्ध झाले होते. विभक्त होण्यापूर्वी “ही दिवाळी पूर्वीसारखी असणार नाही,” अशी गौतम सिंघानिया यांनी सोशल मीडिया पोस्ट केली होती.