रविंद्र महाजनी पत्नीसाठी ठेवून गेले या २ आठवणी….दिलखुलास महाजनींबद्दल पत्नीने खूप चांगलं देखील लिहलं आहे जे कोणीही सांगत नाही
रविंद्र महाजनी यांच्यासारखा देखणा नायक मिळणं हे खरं तर मराठी सृष्टीचं मोठं भाग्यच म्हणावं लागेल. कारण त्यानंतर असा देखणा सुपरस्टार आजतागायत मराठी सृष्टीला मिळालेला नाही असे मत अनेक प्रेक्षकांचं असेल. रविंद्र महाजनी यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी माधवी यांनी आत्मचरित्र प्रकाशित केलं. या आत्मचरित्रात त्यांच्या आयुष्यात जे काही घडलं ते त्यांनी प्रांजळपणे मांडलं आहे. संसार म्हटलं की सुख दुःखं आलीच. ते अनुभव महाजनी कुटुंबानेही घेतले. पण आज रविंद्र महाजनी यांची दुसरी बाजू देखील आपण इथे मांडणार आहोत जी माधवी महाजनी यांच्या आत्मचरित्रात लिहिली आहे. व्यसन, जुगार या गोष्टी रविंद्र महाजनी यांनाही मान्य नव्हत्या, फक्त पैसा मिळत रहावा या आशेने त्यांनी चुकीचा मार्ग निवडला होता.
पण जेव्हा त्यांनी मराठी सृष्टीचा सुपरस्टार अशी ओळख मिळवली तेव्हा मात्र त्यांनी जुगार खेळणे सोडून दिले होते. ‘नोकरी करायची नाही, हिरो बनायचं’ हे त्यांचं स्वप्न होतं आणि ते त्यांनी सत्यात उतरवलं होतं. मराठी सह त्यांना हिंदी, गुजराथी चित्रपटासाठी विचारणा होऊ लागली होती. भरपूर मानसन्मान मिळवला, प्रसिद्धी मिळाली, पैसेही पुष्कळ कमावले. मिळालेले हे सर्व पैसे ते पत्नीच्या हातात आणून देत असत. जेव्हा भरभराटीचे दिवस आले तेव्हा मुलगी रश्मीचा वाढदिवस ते एखाद्या लग्नासारखा थाटात साजरा करत असत. कित्येक दिवसानंतर शूटिंगहून घरी आले की मुलांना ते येतानाच नवीन कपडे आणत असत. अर्थात रविंद्र महाजनी यांची निवड देखील चांगली असल्याने मुलांना ते कपडे आवडत असत. पत्नीसोबत गप्पा मारणे, फिरायला जाणे, नातेवाईकांसोबत वेळ घालवणे अशा गोष्टींमुळे त्यांचं व्यक्तिमत्त्व किती दिलखुलास होतं याची प्रचिती येते.
रविंद्र महाजनी यांना विशिष्ट पानपट्टीवरचे पान खायला आवडत असे. दिसभरात ते तीन चार वेळा तरी पान खायचे. पान खायला ते पत्नीलाही सोबत घेऊन जायचे. त्यामुळे माधवी यांनाही पान खाण्याची आवड लागली होती. कोल्हापूरहुन शुटिंगवरून आल्यानंतर त्यांनी पत्नीसाठी हिऱ्यांच्या कानातल्या कुड्या आणल्या होत्या. ४५ वर्षांपूर्वी त्या ४० हजार रुपयांच्या होत्या. रविंद्र महाजनी यांनी अभिनया व्यतिरिक्त बांधकाम व्यवसायातही नशिब आजमावले होते. यात त्यांना फायदा झाल्याने पत्नीला त्यांनी स्वतः डिझाइन केलेलं सुपरडीलक्स हिऱ्यांचं मोठं मंगळसूत्र भेट दिलं होतं. ३० वर्षांपूर्वी ते मंगळसूत्र तीन लाख रुपयांचं होतं. कालांतराने रविंद्र महाजनी यांनी रागाच्या भरात त्या कुड्या आणि मंगळसूत्र माधवी यांच्या कडून मागून घेतलं होतं. पण पत्नीसाठी प्रेमाने आणलेल्या त्या दोन्ही गोष्टी त्यांनी शेवटपर्यंत तशाच जपून ठेवल्या होत्या. प्रेमाने दिलेली ही भेट पाहिली की माधवी यांना आजही गहिवरून येतं.