रंजना कधीच चालणार नाही हे पाहून पायाखालची जमीनच सरकली २५ ऑपरेशन्स झाली २ वर्ष निघून गेली मग शेवटी नाईलाजाने
आज ३ मार्च, अभिनेत्री रंजना देशमुख हिचा २४ वा स्मृतिदिन. आई वत्सला देशमुख हिच्या पावलावर पाऊल टाकत अभिनेत्री रंजनाने अभिनय क्षेत्राची वाट धरली होती. झुंज, मुंबईचा फौजदार, सुशीला, बिन कामाचा नवरा असे अनेक चित्रपट रंजनाने तिच्या सहजसुंदर अभिनयाने गाजवले होते. पण एका भीषण अपघातानंतर रंजनाचे संपूर्ण आयुष्यच पालटून गेले. १९८८ साली प्रदर्शित झालेला पंढरीची वारी हा चित्रपट रंजना करणार हे अगोदरच ठरले होते. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रमाकांत कवठेकर यांनी केले होते तर चित्रपटाची निर्मिती अण्णासाहेब घाटगे यांची होती. हा चित्रपट बनवण्यासाठी अण्णासाहेब घाटगे यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. जयश्री गडकर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाल्या पण त्यांच्या अगोदर रंजना हा चित्रपट करणार होत्या. चित्रपटाचे आळंदी ते पंढरपूर मार्गे असे ७० टक्के काम पूर्ण झाले होते.
पण दुसऱ्या चित्रपटाच्या शूटिंगला जात असताना रंजनाचा अपघात झाला. त्यावेळी हा चित्रपट रंजनानेच करायचा असा अट्टाहास अण्णासाहेब घाटगे यांचा होता. अपघातानंतर रंजना यांच्यावर छोटी मोठी अशी २५ ऑपरेशन झाली होती. दरवेळी त्या आता चालायला लागतील असा विश्वास अण्णासाहेबांना होता. मात्र दोन वर्षे झाली तरीही रंजना अंथरुणाला खिळुन राहिल्या. अण्णांच्या सर्व नातेवाईकांनी त्यांना हा चित्रपट सोडून देण्याचा सल्ला दिला होता. अखेरीस रंजना आता पुन्हा कधीच चालणार नाही हे कळल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण अण्णासाहेबांनी हा चित्रपट बनवण्यासाठी होता नव्हता तेवढा जवळचा सर्व पैसा खर्च केला होता. त्यावेळी त्यांना हा चित्रपट बनवण्यासाठी १८ लाख रुपये खर्च आला होता. चित्रपटात अरुण सरनाईक यांचीही मुख्य भूमिका होती मात्र अपघातात झालेल्या यांच्या निधनाने देखील अगोदरच दोन वर्षे अशीच गेली होती. विठुरायासाठी चित्रपट तर पूर्ण करायचा हा ठाम निर्णय घेऊन दोन वर्षे वाट पाहिल्यानंतर रंजना यांची परवानगी घेऊन अण्णासाहेब घाटगे यांनी ही भूमिका जयश्री गडकर यांना देऊ केली. चित्रपटाचे पोस्टर ठरले होते त्यात रंजना छोट्या बकुल कवठेकरला खांद्यावर घेऊन उभ्या असतात. हे पोस्टर बदलण्यात आले.
झालेल्या नुकसानाची तमा न बाळगता चित्रपट पुन्हा एकदा नव्याने चित्रित करण्यात आला. २८ डिसेंबर १९८८ रोजी चित्रपटाच्या प्रदर्शनाचा तो दिवस उजाडला. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तोबा गर्दी केली. धरिला पंढरीचा चोर ही गाणी आसमंतात दुमदुमू लागली. जयश्री गडकर, बाळ धुरी, राजा गोसावी, राघवेंद्र कडकोळ, दिनानाथ टाकळकर, सुरेश विचारे, आशा पाटील, नंदिनी जोग, बकुल कवठेकर, अशोक सराफ, अनुप जलोटा यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. विठुरायाच्या रूपातला बकुल कवठेकर हा चिमुरडा न बोलताही केवळ चेहऱ्यावरील हावभावावरून प्रेक्षकांना रडवून गेला. अण्णासाहेब घाटगे यांचा मुलगा निशांत घाटगे हे या चित्रपटाचे साक्षीदार आहेत. या चित्रपटाच्या आणि रंजना सोबतच्या अनेक आठवणी त्यांच्याजवळ आहेत. हा चित्रपट आठवला की रंजना आत्याबद्दल ते नेहमी भरभरून लिहितात. हा चित्रपट रंजनाने केला असता तर तोही निश्चितच गाजला असता.