काही दिवसांपूर्वी रंग माझा वेगळा मालिकेतील मुख्य अभिनेत्री रेश्मा शिंदे हिचा लग्नसोहळा पार पडला होता. आता याच मालिकेतली आणखी एक अभिनेत्री नुकतीच लग्नबांधनात अडकली आहे. अभिनेत्री सोनाली साळुंखे हिने २४ डिसेंबर रोजी धुळ्यात हे लग्न केले आहे. लग्नाचे काही खास क्षण तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. सोनाली साळुंखे ही गेली अनेक वर्षे मालिका क्षेत्रात काम करत आहे. रंग माझा वेगळा या मालिकेत तिने एक विरोधी पात्र साकारले होते.
छोट्या मोठ्या भूमिका साकारणाऱ्या सोनालीने नाटकातून अभिनय क्षेत्राचा प्रवास सुरु केला होता. रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकातून तिने येसूबाईचे प्रमुख पात्र निभावले होते. यातुनच सोनालीला मालिका सृष्टीत येण्याची संधी मिळाली. क्रिमीनल्स चाहूल गुन्हेगारांची, गाथा नवनाथांची, या मराठी मालिकांसह तीने क्राईम पेट्रोल, चुस्की जिंदगी की, विघ्नहर्ता गणेशा अशा हिंदी मालिकेतून अभिनयाची छाप पाडली आहे.
छोट्या बायोची मोठी स्वप्नं या मालिकेत तिने हेतलचे अतरंगी पात्र साकारलेले पाहायला मिळाले. ऑक्टोबर महिन्यात अभिनेत्री सोनाली साळुंखे हीने साखरपुडा केला होता. तेव्हा या साखरपुड्याच्या बातमीवर सेलिब्रिटींनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला होता. तूर्तास या नवविवाहित दाम्पत्याला आयुष्याच्या या नवीन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन!.