प्राजक्ताच्या “प्राजक्तकुंज”ची वास्तुशांती … घरातील ४ पिढ्या एकत्र येऊन केली पूजा आनंद द्विगुणित
अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या कुटुंबासह कर्जतमधील फार्महाऊसमध्ये एका खास कारणासाठी गेली आहे. जुलै महिन्यात प्राजक्ताने एक दिमाखदार फार्महाऊस खरेदी केले होते. आपले ड्रीमहाऊस खरेदी करण्याचे स्वप्न साकार झाले असे म्हणत कर्जतमध्ये घेतलेल्या या फार्महाऊसची झलक तिने सोशल मीडियावर शेअर केली होती. कुटुंबातील सगळ्यात मोठं कर्ज घेऊन मी हे फार्महाऊस खरेदी केलं असेही त्यात तिने म्हटले होते. हे कर्ज लवकरात लवकर फेडता यावे म्हणून तिने तिच्या चाहत्यांकडून आशीर्वाद मागितला होता. प्राजक्ताने या फार्महाऊसचा ताबा घेतल्यानंतर तिने तिच्या या ड्रीम होमला “प्राजक्तकुंज ” असे नाव दिले. त्यानंतर तिने हे फार्महाऊस भाडेतत्वावर देण्याचे ठरवले.
तिच्या या फार्महाऊसला अनेक पर्यटकांनी भेट दिली आहे, या पर्यटकांकडून तिला खूप चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. अशातच आज प्राजक्ताने तिच्या या फार्महाऊसची वास्तुशांती केलेली पाहायला मिळते आहे. प्राजक्ता तिच्या आईवडील, भाऊ, वहिनी, भाच्यांसह या वास्तुशांतीला हजर होती. यावेळी प्राजक्ताचे आजी आजोबा देखील खास पंढरपूरहुन तिथे आले होते. चार पिढ्या प्राजक्तकुंजला एकत्र आल्यामुळे प्राजक्ता खूपच खुश झाली आहे. या कुटूंबासोबतचे आनंदाचे क्षण तिने तिच्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. आपल्या नात्यातील मंडळींसमवेत प्राजक्ताने हा क्षण साजरा केल्याने तिचा हाच साधेपणा चाहत्यांना आवडला आहे.
नेहमी सेलिब्रिटींना आमंत्रित करून त्या सोहळ्याचा तोरा मिरवण्यापेक्षा आपल्या नात्यातल्या लोकांसोबत हे क्षण साजरे करायला हवेत हेच तिने दाखवून तिने तिच्या साधेपणाने प्रेक्षकांचीही मनं जिंकून घेतली आहेत. शूटिंगच्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून प्राजक्ता नेहमी तिच्या या फार्महाऊसला भेट देत असते. इथे आल्यानंतर जे समाधान मिळतं ते कुठेच मिळत नाही असे तिचे म्हणणे आहे. दरम्यान प्राजक्ता माळी एक अभिनेत्री म्हणून यशस्वी तर झालीच पण आता एक व्यावसायिका म्हणूनही स्वतःचे नाव मिरवत आहे. या यशस्वी वाटचालीसाठी प्राजक्ताचे मनःपूर्वक अभिनंदन.