शूटिंग झाल्यावर पैसे देतो म्हणून आता ६ महिने झाले तरीही कलाकारांचे…नितीन नांदगावकर यांनी घेतला निर्मात्यांचा खरपूस समाचार
कलाकारांचे पैसे थकवले असल्याच्या घटना अनेकदा मराठी इंडस्ट्रीत ऐकायला मिळतात. काही दिवसांपूर्वीच गायिका प्रियांका बर्वे हिने अनेक गाण्यांचे पेमेंट मिळाले नसल्याची खंत व्यक्त केली होती. तर शशांक केतकर, आशा ज्ञाते असो किंवा मृणाल दुसानिस या मोठ्या कलाकारांचे देखील पैसे निर्मात्याने दिले नाहीत अशी माहिती त्यांनी वारंवार मुलाखतीत दिलेली आहे. पण याचा परिणाम त्या निर्मात्यांवर होतो की नाही हा मोठा प्रश्न आहे. मराठी कलाकारांचे हक्काचे पैसे मिळावेत त्यांच्या कामाचा मोबदला वेळच्या वेळी मिळावा असे अनेकदा पुढे आले पण कलाकारांना कोणी वाली उरला नाही असेच चित्र दिसून आले पण आता नुकत्याच एका घटनेत कलाकारांनी राजकीय मंडळींची मदत घेऊ पाहिली आहे. आणि तिथल्या तिथे निर्मात्याला चपराक सुद्धा मिळालेली आहे. कलाकारांचे पैसे ताबडतोब द्या अन्यथा तुमचे वेबसिरीज किंवा मालिका चालू देणार नाही असाच इशारा नितीन नांदगावकर यांनी दिला आहे. नितीन नांदगावकर हे जनता दरबाराच्या माध्यमातून सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी धडपडत असतात.
बिल्डरने फ्लॅट दिला नसेल, कोणाची ऑनलाइन फसवणूक झाली असेल, कामगारांचे कामाचे पैसे अडकवले असतील अशा सर्व गोष्टींना न्याय मिळवून देण्याचे काम नितीन नांदगावकर करत असतात. त्यांच्याकडे तक्रार घेऊन आलेल्या सामान्य नागरिकाचा फायदा देखील त्यांनी करून दिला आहे. अशाच एका प्रकरणी काही कलाकारांनी नितीन नांदगावकर यांची भेट घेतली. जनता दरबारमध्ये या दोन महिलांनी झी 5 च्या एका वेबसिरीजसाठी काम केले होते. ‘काली’ या नावाची वेबसिरीज दिग्दर्शक योगेश म्हापणकर यांनी दिग्दर्शित केली होती. झी 5 ची ही वेबसिरीज बनवण्यासाठी हिनाने योगेशला असिस्टंट केले होते. तर मधू हिने या वेबसिरीजमध्ये रिपोर्टर म्हणून काम केले होते. फेब्रुवारी महिन्यात या वेबसिरीजचे काम पूर्ण झाले. पण अजूनही योगेशने या दोन्ही कलाकारांना त्यांच्या कामाचे पैसे दिले नाहीत अशी तक्रार या दोघी नितीन नांदगावकर यांच्याकडे घेऊन आल्या. मधूने काम केल्याचे ५ हजार रुपये आणि हिनाचे ५५ हजार रुपये योगेशने अजूनही दिले नाही असे या दोघींनी तक्रारीत म्हटले आहे. तेव्हा नितीन नांदगावकर यांनी ताबडतोब योगेशशी फोनवरून संवाद साधला. आणि इतके दिवस होऊनही दोघींचे पैसे का अडकवले? असा खडसावून प्रश्न विचारण्यात आला.
महिलांचे कामाचे पैसे का अडकवले त्यांचे पैसे ताबडतोब देऊन टाका असे नितीन नांदगावकर यांनी खरपूस शब्दांत योगेशचा समाचार घेतला. यावर योगेशचे उत्तर होते की, निर्मात्याने मला अजूनही पैसे दिले नाही आणि त्यांनी दिले की मी त्यांना देतो असे योगेश यांचे म्हणणे होते. तेव्हा नितीन नांदगावकर यांनी त्या निर्मात्याची तक्रार माझ्याकडे घेऊन या… अन्यथा तुमची वेबसिरीज रिलीज होऊ देणार नाही अशी धमकी वजा इशाराच नितीन नांदगावकर यांनी निर्मात्याला आणि दिग्दर्शक योगेश म्हापणकर यांना दिला आहे. कलाकारांची बाजू मांडण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नितीन नांदगावकर यांनी आता पुढाकार घेतला आहे. त्यामुळे किमान सामान्य कलाकारांचे प्रश्न मार्गी लागतील अशी एक आशा पल्लवित झाली आहे. यामुळे नितीन नांदगावकर यांचेही मोठे कौतुक केले जात आहे.