छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारावी ती सूर्यकांत मांडरे यांनी. अजूनही मराठी प्रेक्षकांच्या मनावर त्यांच्या त्या अभिनयाची छाप आहे. चंद्रकांत आणि सूर्यकांत या कोल्हापूरच्या भावंडांनी मराठी चित्रपट सृष्टीचा एक काळ चांगलाच गाजवलेला पाहायला मिळाला होता. देखणा रुबाबदार चेहरा, उंचपुरे धिप्पाड शरीर यांमुळे मराठी चित्रपटाचा नायक अशी त्यांची ओळख बनली होती. बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात त्यांनी पाऊल टाकलं होतं. थोरातांची कमळा, मोहित्यांची मंजुळा, महाराणी येसूबाई, मल्हारी मार्तंड, कुलदैवत, केतकीच्या बनात, धन्य ते संताजी धनाजी, गनिमी कावा, अखेर जमलं, संत निवृत्ती ज्ञानदेव अशा विविध विषयांवरील चित्रपटातून त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावल्या.
कुठलाही डमी कलाकार न घेता घोडेस्वारी ते स्वतः करत असत. एका हिंदी चित्रपटात त्यांनी वाघाशी झुंज करणारे साहसदृश्य दिले होते. केवळ अभिनेते म्हणून नाही तर चंद्रकांत मांडरे हे लेखक, चित्रकार आणि शिल्पकार म्हणूनही ओळखले जात होते. पावडर शेडिंगमध्ये त्यांचा हातखंडा होता. सूर्यकांत मांडरे यांनी १९४७ साली सुशिला पिसे यांच्याशी विवाह केला. आयुष्यात आलेल्या अनेक चढ उतारांमध्ये पत्नीची त्यांना भक्कम साथ मिळाली. प्रकाश मांडरे हे त्यांच्या मुलाचे नाव. तर स्वरूपा मांडरे पोरे ही त्यांची नात. कुटुंबातील प्रत्येक सदस्या सोबत सूर्यकांत यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. नात स्वरूपासोबत असले की ते लहान होऊन तिच्याशी खेळत.
नात आजोबा पेक्षा त्यांच्यातली मैत्री खूप जवळची होती असे स्वरूपा यांचे म्हणणे आहे. आपल्या आजोबांची चित्रं, शिल्प , पुरस्कार, छायाचित्रे, पुस्तकं पुण्यातील भीमसेन जोशी संग्रहालयात ठेवण्यात आली होता. पण कालांतराने हा अनमोल ठेवा पुणे महापालिकेने अन्यत्र हलवला तेव्हा स्वरूपा पोरे यांनी हा ठेवा शिवाजी विद्यापीठाच्या संग्रहालयात ठेवण्याची मागणी केली. पण आता कोल्हापूर येथे आजोबांची आर्ट गॅलरी व्हावी अशी तिची मनापासून ईच्छा आहे. त्यांची ही ईच्छा लवकरच पूर्णत्वास येवो ही सदिच्छा.