आज नितु सिंगचा वाढदिवस मराठीतही एका अभिनेत्रीला या नावाची मिळाली ओळख… हुबेहूब दिसणाऱ्या या मराठी अभिनेत्रीला ओळखलंत
आज ८ जुलै बॉलिवूड अभिनेत्री नितु सिंग कपूर यांचा वाढदिवस. नितु सिंग यांनी त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले. यात त्यांनी अनेक कलाकारांसोबत काम केले, पण त्यांची आयुष्याची खरी जोडी जुळली ती ऋषी कपूर यांच्या सोबत. आज वयाच्या ६५ व्या वर्षी देखील नितु सिंग तेवढ्याच सुंदर आणि फिट पाहायला मिळतात. मराठी चित्रपट सृष्टीतही एका अभिनेत्रीला नितु सिंग यांची ओळख मिळाली आहे. हुबेहूब नितु सिंग यांच्यासारख्या दिसणाऱ्या या मराठमोळ्या अभिनेत्रीबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात. काही कलाकार हे एक दोन चित्रपट करून अभिनय क्षेत्रातून बाजूला होतात पण तरीही प्रेक्षकांच्या ते चांगलेच स्मृतीत राहिलेले आहेत. या अभिनेत्रीने मराठी इंडस्ट्रीत ‘शलाका’ नावाने स्वतःची ओळख बनवली.
दिसायला नितु सिंग सारख्या असल्याने त्यांना मराठीची नितु सिंग म्हणूनही ओळखले जाऊ लागले होते. ठकास महाठक हा १९८४ सालचा गाजलेला चित्रपट. या चित्रपटात अशोक सराफ यांच्या नायिकेच्या भूमिकेत शलाका दिसल्या होत्या. ‘आज पांघरु नशा धुक्याची…’ हे रोमँटिक गाणं दोघांवर चित्रित झालं होतं. या चित्रपटामुळे अभिनेत्री शलाका प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. खरं तर ८० च्या दशकातली नायिका म्हणून त्या ओळखल्या जातात. या चित्रपटाअगोदर त्यांनी नणंद भावजय, मायबाप, आपलेच दात आपलेच ओठ, घर जावई, आटापिटा, शरण तुला भगवंता चित्रपटातून महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. नणंद भावजय चित्रपटातील ‘ चंपा चमेली की जाई अबोली…’ हे गाणं पद्मश्री जोशी कदम आणि शलाका यांच्यावर चित्रित झालं होतं. शलाका यांचं आताचं नाव आहे ‘सीना धराधर’. शलाका याच नावाने त्यांनी मराठी इंडस्ट्रीत ओळख बनवली होती.
चित्रपटातील त्यांची इमेज अगदी नितु सिंग यांच्यासारखीच दिसत असल्याने त्या मराठीची नितु सिंग म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. त्या या इंडस्ट्रीतून बाजूला जाऊन आज बरीच वर्षे लोटली आहेत. शलाका म्हणजेच सीना धराधर यांचे बालपण मुंबईतील वांद्रे येथे गेलं. अभिनयाची आवड असल्याने त्यांनी नाटकातून काम केले होते. चित्रपटात अशोक सराफ यांच्यासोबत त्यांना मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. सीना धराधर यांनी पेशाने डॉक्टर असलेल्या व्यक्तीसोबत लग्न केले. त्यांना तनुश्री नावाची एक मुलगीही आहे. तनुश्रीचे लग्न झाले असून कुटुंबासह ती सिंगापूरला स्थायिक झाली आहे. तनुश्रीला एक गोड मुलगीही आहे. सीना धराधर आता आपल्या या गोड नातीसोबत वेळ घालवताना दिसतात. मुंबईतील जोगेश्वरी भागात त्या आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास आहेत. आजही त्या तेवढ्याच उत्साही आणि सुंदर दिसतात हे विशेष. अभिनय क्षेत्रात त्या पुन्हा दाखल झाल्या तर प्रेक्षकांनाही ते नक्कीच आवडेल.