१८ मार्च रोजी सुरू झालेल्या झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. राकेश बापट हा तगडा कलाकार मराठी मालिकेतून प्रथमच छोट्या पडद्यावर प्रमुख भूमिका साकारत आहे. याअगोदर राकेशने हिंदी मालिका, चित्रपट तसेच मराठी चित्रपटातून काम केले होते. पण स्टार प्रवाह वाहिनीला तगडी टक्कर देण्यासाठी झी मराठी वाहिनीने वेगवेगळे प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. मालिकेत अभिराम हा पूर्वविवाहित दाखवला आहे. अंतरा ही त्याची पहिली पत्नी असल्याचे दर्शवण्यात आले आहे. अंतराने लिहून ठेवलेली पत्र त्याला दरवर्षी मिळतात. ह्यावेळी शेवटच्या पत्रात तिने अभिरामने पुन्हा लग्न करावे अशी इच्छा व्यक्त केली आहे.
त्यानुसार मालिकेतील दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मी या तिन्ही सुना जोरदार तयारीला लागल्या आहेत. शर्मिला शिंदे, भूमीजा पाटील, सानिका काशीकर या तिघी ही पात्र निभावताना दिसत आहेत. मालिकेत लक्ष्मी जहागीरदार हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात…. लक्ष्मीची भूमिका अभिनेत्री सानिका काशीकर हिने साकारली आहे. सानिका ही थिएटर आर्टिस्ट असून तिने रंगभूमीवरून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. व्यावसायिक नाटकातून काम करत असताना तिला आनंदी हे जग सारे मालिकेत झळकण्याची संधी मिळाली. वैजू नं १, अनुराधा, काव्यांजली अशा मालिका वेबसिरीज मध्ये सानिकाने महत्वपूर्ण भूमिका साकारलेल्या पाहायला मिळाल्या. मन झालं बाजींद या झी मराठीच्या मालिकेतून तिला प्रथमच नकारात्मक भूमिका साकारण्याची संधी मिळाली. नकारात्मक भूमिका असल्याने ती याबाबत थोडी साशंक होती, पण जसजसे प्रमुख पात्रांइतकेच तिच्या अंतराच्या भूमिकेला ओळखले जाऊ लागले तसतसे तिच्या अभिनयाचे पैलू उलगडत गेले.
काव्यांजली मालिकेत तिचे पात्र अशाच काही धाटणीचे होते. या मालिकेनंतर सानिकाला पुन्हा एकदा झी मराठीवर झळकण्याची संधी मिळाली आहे. नवरी मिळे हिटलरला या मालिकेमुळे तिला लक्ष्मीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. सानिका काशिक ही प्रसिद्ध कलाकार आनंद काशीकर यांची मुलगी आहे. संगीताचा वारसा लाभलेल्या काशीकर कुटुंबात ती लहानाची मोठी झाली. आजवर अनेक मंचावर तिच्या वडिलांनी म्हणजेच आनंद काशीकर यांनी बासरीवादन केले आहे. तर सानिकाचा भाऊ अद्वैत काशीकर हा सुद्धा उत्कृष्ट बासरीवादक आहे. पण संगीत क्षेत्राचा वारसा लाभलेला असताना त्यात करिअर न करता सानिकाने अभिनय क्षेत्राची वाट धरली. आणि या क्षेत्रात ती आता चांगलाच जम बसवताना पाहायला मिळत आहे.