news

हिंदी मालिका गाजवणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीची मराठी मालिकेत एंट्री साकारणार महत्वपूर्ण भूमिका

हिंदी मालिका गाजवणारे मराठी कलाकार आता झी मराठी वाहिनीच्या मालिकेत झळकणार आहेत. लवकरच झी मराठीवर ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका दाखल होणार आहे. यात राकेश बापट अभिराम जहागीरदारची भूमिका साकारताना दिसणार आहे. राकेश बापट हा हिंदी चित्रपट मालिका अभिनेता पण कालांतराने तो मराठी चित्रपटाकडे वळला. वृंदावन, सविता दामोदर परांजपे या चित्रपटानंतर आता तो प्रथमच मराठी मालिका साकारताना दिसणार आहे. त्याच्या जोडीला हिंदी मालिका गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री पल्लवी प्रधान हिचीही या मालिकेतून मराठी सृष्टीत एन्ट्री होत आहे. पल्लवी प्रधान ही मराठी असली तरी तिने गुजराथी नाटकातून आपल्या अभिनयाचा प्रवास सुरु केला होता. प्रनोती प्रधान आणि पल्लवी प्रधान या दोघी बहिणी नाटक, दूरदर्शनवरील मालिकेतून बालकलाकार म्हणून झळकल्या आहेत.

pallavi pradhan actress in marathi serial
pallavi pradhan actress in marathi serial

पुढे त्यांना हिंदी मालिका सृष्टीत महत्वपूर्ण भूमिका साकारण्याची संधी मिळत गेली. पल्लवी प्रधान यांनी ‘लगोरी मैत्री रिटर्न्स’ या मराठी चित्रपटात काम केले होते. त्यागोदरही त्यांनी मराठी मालिकेत छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. पण हिंदी मालिका सृष्टीत त्यांच्या अभिनयाला पुरेसा वाव मिळत गेला. बहु हमारी रजनीकांत, वो तो है अलबेला, सजन रे झूठ मत बोलो, जिजी माँ अशा मालिकेतून त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारून प्रेक्षकांची पसंती मिळवली. आता हिंदी मालिका गाजवल्यानंतर पल्लवी प्रधान पुन्हा एकदा मराठी मालिकेकडे वळल्या आहेत. बऱ्याच प्रतीक्षेनंतर त्यांना पुन्हा एकदा मराठी सृष्टीत काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे या नवीन भूमिकेबाबत त्या खूपच उत्सुक आहेत. दरम्यान राकेश बापट सोबत त्यांनी एका हिंदी मालिकेतून एकत्रित काम केले होते. त्यामुळे त्यांच्यात एक छान बॉंडिंग तयार झालेले आहे.

pallavi pradhan in navari mile hitlarla
pallavi pradhan in navari mile hitlarla

राकेश सोबत पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळतेय आणि तेही आपल्या मातृभाषेत यामुळे दोघेही या मालिकेबाबत खुपच उत्सुक आहेत. नाना पाटेकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सायली संजीव यांच्या ‘ओले आले’ या चित्रपटात पल्लवी प्रधान यांनी एक छोटीशी भूमिका साकारली होती. त्यामुळे त्यांना मराठी मालिकेसाठी विचारणा करण्यात आली. नवरी मिळे हिटलरला या मालिकेत आणखी कोणकोणते कलाकार झळकणार हे येत्या काही दिवसातच समोर येईल. तूर्तास मराठी मालिकेतील पुनरागमनाबद्दल पल्लवी प्रधान यांचे अभिनंदन आणि या नवीन भूमिकेसाठी शुभेच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button