४ वर्षांची असताना मी लक्ष्मीकांत सोबत चुकून नाचत नाचत पुढे गेले….अशी झाली मुक्ता बर्वेची भावाच्याच चित्रपटात एन्ट्री
‘नाच गं घुमा’ या चित्रपटातून अभिनेत्री मुक्ता बर्वे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. सोबतच अलिबाबा आणि चाळिशीतले चोर हेही तिचं नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. त्यामुळे मुक्ता बर्वे सध्या चर्चेत आलेली पाहायला मिळत आहे. याचनिमित्ताने आज तिच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात. मुक्ता बर्वे हिची आई शिक्षिका लहानपणी ती फारशी बोलकी नसल्याने तिच्या आईने तिच्यासाठी बालनाट्य लिहिले होते. यातूनच मुक्ताला अभिनयाची आवड निर्माण झाली. पण तिला डान्सची खूप आवड होती. मुक्ता बर्वे आजही खूप कमी बोलते तिला तिच्या कम्फर्ट झोनमध्ये राहायला जास्त आवडतं. नवीन व्यक्तींसोबत ओळख व्हायला तिला उशीर लागतो.
त्यामुळे ‘ही खूप आगाऊ आहे, हिला खूप माज आहे’ असं तिच्या बरोबर काम करणाऱ्या व्यक्तींचा तिच्याबद्दल गैरसमज झालेला असतो. पण ती तशी मुळीच नाही हे ते तिला येऊन सांगतात. मुक्ता बर्वेचा भाऊ हा देखील उत्तम अभिनेता आहे. त्याच्याच चित्रपटातून मुक्ताचे मोठ्या पडद्यावर पदार्पण झाले होते. निनाद बर्वे हा मुक्ताचा भाऊ आहे. मास्टर निनाद या नावाने त्याने मराठी चित्रपटात काम केले होते. १९८७ साली ‘खट्याळ सासू नाठाळ सून’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. वर्षा उसगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, नितीश भारद्वाज, प्रेमा किरण, स्मिता तळवलकर, मोहन जोशी, दया डोंगरे असे कलाकार या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात मुक्ताच्या भावाने हर्षदची भूमिका साकारली होती. कोल्हापूरला या चित्रपटाचे शूटिंग मे महिन्यात करण्यात आले होते. दादाच्या चित्रपटाचे शूटिंग म्हणून मुक्ता आईसह कोल्हापूरला गेली होती. त्यावेळी मुक्ता अवघ्या ४ ते ५ वर्षांची होती.
शालिनी सिनेटोन येथे खट्याळ सासू नाठाळ सून ह्या गाण्याचे शूटिंग चालू होते . सेटवर गाणं वाजलं तसं मुक्ता नाचायला लागली. नाचता नाचता ती चुकून पुढे आली तेव्हा अण्णासाहेब देऊळगावकर यांनी ‘कट कट’ म्हणत चित्रपटाचे शूटिंग थांबवले. आपल्यामुळे शूटिंग थांबवण्यात आलं हे पाहून मुक्ताची आई घाबरली आणि सॉरी सॉरी म्हणत त्यांनी अण्णासाहेब देऊळगावकर यांची माफी मागितली. पण त्यानंतर ‘ही मुलगी चांगली नाचतेय हिच्याकडे चांगले कपडे आहेत का’ म्हणत अण्णासाहेब देऊळगावकर यांनीच मुक्ताला त्या गाण्यात घेतले होते. त्यानंतर हॉटेलमध्ये असलेले निनादच्या मुंजीचे कपडे मुक्ताला घालण्यात आले आणि अशा पद्धतीने मुक्ताचे मोठ्या पडद्यावर पदार्पण झाले होते.