एवढे वर्षे काम केल्यानंतर स्वतःच घर घेतलं पण त्याचे हप्ते अजूनही… मी बऱ्याच लोकांना पैसे दिले काहींनी जाणून बुजून बुडवले तर काहींनी मला
कलाकारांकडे आज काम आहे पण ते उद्या असेल की नाही याची शाश्वती कोणालाही देता येत नाही. आज तुम्ही एका चित्रपटामुळे किंवा मालिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात असता पण भविष्यात तुम्हाला दुसरा प्रोजेक्ट मिळवायचा असेल तर त्यासाठी स्ट्रगल करणे भाग आहे. काही मोजके कलाकार आहेत ज्यांना या इंडस्ट्रीत ठराविक भूमिका दिली जाते. पण मग पुढच्या कामासाठी तुम्ही कितीही चांगले कलाकार असाल किंवा वर्षानुवर्षे काम केलं असेल तरीही तुम्हाला ऑडिशन देणे भाग असते. हे काम केल्यानंतर तुमच्या कामाचे पैसे तुम्हाला मिळतीलच याचीही शाश्वती तुम्हाला नसते.
हा स्ट्रगल मिलिंद गवळी यांनाही चुकलेला नाही. मिलिंद गवळी यांनी मराठी चित्रपट सृष्टीचा एक काळ नायक म्हणून गाजवला होता. आता ते मालिकेतून सहाय्यक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आई कुठे काय करते या मालिकेतून ते चक्क विरोधी भूमिकेत पाहायला मिळाले. त्यांनी साकारलेला अनिरुद्ध प्रेक्षकांच्या टीकेला सामोरे गेला . पण हीच त्यांच्या अभिनयाची खरी पावती ठरली. मराठी इंडस्ट्रीत एवढे वर्षे काम केल्यानंतरही मुंबईत हक्काचं घर घेणं मुळीच सोपं नाही असे ते म्हणतात. याबद्दल त्यांनी नुकतेच म्हटले आहे की, “मी एक कलाकार आहे, तरीही मला काम मिळवण्यासाठी धडपड करावीच लागते. मुंबईत घर घेणं साधी गोष्ट नाही. मी स्वतः एवढे वर्षे काम केल्यानंतर स्वतःच घर घेतलं पण त्याचे हप्ते मी अजूनही भरतोच आहे.
सुरुवातीच्या काळात मी काम केलं तेव्हा माझे बरेचसे पैसे अडकून होते. आजपर्यंत मला ते मिळालेले नाहीत. काहींनी ते जाणूनबुजून दिले नाहीत तर काहींना आर्थिक तोट्यामुळे देता आले नाहीत. पण मी ते पैसे कधीच त्यांच्याजवळ मागितले नाहीत.” मालिकेत काम करताना कलाकारांना दिवसाची रात्र करावी लागते. दहा ते बारा तास शूटिंग करावं लागतं. हे काम करूनही आपले पैसे मिळत नाहीत अशी परीस्थिती अनेकांनी उघडकीस आणली आहे. काही दिवसांपूर्वीच गौतमी देशपांडे हिने यासंदर्भात एक पोस्ट लिहिली होती. आपल्याच कामाचे पैसे कितीदा मागायचे असा प्रश्न तिने उपस्थित केला होता.