गेल्या काही दिवसांत मराठी सृष्टीतील अनेक कलाकारांचं मुंबईत हक्काचं घर घेण्याचं स्वप्न साकार झालं आहे. काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब हिने भाड्याच्या घरातून थेट हक्काच्या २ बीएचके मध्ये प्रवेश केला होता. तिच्या घराच्या हटके नेमप्लेटने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. मराठी कलाकार आता कुठेही मागे राहिला नाही तेही या एवढ्या महागड्या शहरात आता हक्काचं घर खरेदी करू लागला आहे असेच काहीसे चित्र यावरून दिसून येते. तर शिवाली पाठोपाठ माझ्या नवऱ्याची बायको फेम शनयाच्या मैत्रिणीच्या भूमिकेत झळकलेली अभिनेत्री आदिती द्रविड हिनेही नुकतंच मुंबईत हक्काचं घर खरेदी केल आहे. ‘आणि शेवटी मी मुंबईला हो म्हटलं …’ असं म्हणत तिने या घरात गृहप्रवेश केला.
आदिती द्रविड ही उत्तम अभिनेत्री तर आहेच पण ती उत्तम गाते सुद्धा. याशिवाय ती उत्तम गीतकार देखील आहे हे क्वचितच लोकांना ठाऊक आहे. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातील मंगळागौरचं गाणं हे स्वतः आदिती द्रविडने लिहिलं आहे. सिनेमासाठी म्हणून तिने रचलेलं हे २३ वं गाणं मात्र तेवढंच जोरदार चर्चेत राहिलं. पुण्यात अभिनयाचे धडे गिरवल्यानंतर आदितीची पाऊलं मुंबईकडे वळली. माझ्या नवऱ्याची बायको, सुंदरा मनामध्ये भरली, गोष्ट एका पैठणीची अशा माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत काम करत असताना रसिका सुनील सोबत तिची छान मैत्री झाली होती. मालिकेत काम करत असताना या दोघींनी एकत्र येऊन गाण्यांचा अल्बम काढला होता. त्याला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता. या मालिकेमुळेच आदिती प्रकाशझोतात आली होती.
याचदरम्यान ती प्रसिद्ध क्रिकेटपटू राहुल द्रविडची पुतणी आहे हेही तिच्या चाहत्यांना कळले. दरम्यान मालिका, चित्रपट असा तिचा प्रवास यशस्वीपणे सुरू आहे . मुंबईत भाड्याच्या घरात राहताना खूप स्ट्रगल करावा लागतो, म्हणून आपलंही इथे हक्काचं घर असावं या दृष्टीने आदीतीने मुंबईत घर बुक केलं. काही दिवसांपूर्वीच तिला या घराचा ताबा मिळाला असून आता ती तिच्या हक्काच्या घरात राहायला गेली आहे. एक स्वप्नपूर्ती झाली म्हणत तिने हे गोड क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. ऋतुजा बागवे, सुयश टिळक, पुष्कर जोग, अश्विनी कासार या सर्व सेलिब्रिटींनी तिच्या या स्वप्नपूर्तीवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.