मराठी चित्रपट निर्मात्याने धक्कादायक माहिती केली उघड… सेन्सर बोर्डाच्या अजब कारभाराचा केला जाहीर निषेध
मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नाहीत अशी ओरड अनेकदा पाहायला मिळाली. काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या प्रसाद खांडेकर यांच्या ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाला प्राईम टाइम शो मिळत नव्हते. म्हणून ही बातमी थेट सभागृहातच मांडण्यात आली होती. मराठी चित्रपटांना डावलले जातेय अशी एकच चर्चा रंगल्यानंतर एकदा ठेऊन तर बघा या चित्रपटाला शो मिळू लागले. मग मराठी प्रेक्षकांनी देखील काही ठिकाणी या चित्रपटाला हाऊसफुल्लचे बोर्ड लावण्यास भाग पाडले. पण एकीकडे मराठी चित्रपटाला थिएटर्स मिळत नाहीत असे म्हटले असतानाच प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत असलेल्या “बाजींद ” या चित्रपटाला मात्र सेन्सॉर बोर्डानेच कात्री लावलेली पाहायला मिळाली. त्यामुळे चित्रपटाचे सर्वेसर्वा शहाजी पाटील यांनी खंत व्यक्त केली आहे आणि सेन्सॉर बोर्डचा जाहीर निषेध नोंदवला आहे. शहाजी पाटील यांचा बाजींद हा चित्रपट ८ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार होता मात्र एक मोठा अडथळा आल्याने चित्रपट प्रदर्शित करण्याचेच थांबवण्यात आले. आत्तापर्यंत चित्रपटाच्या निर्मिती आणि जाहिरातीसाठी सर्व खर्च पाहता सुमारे १.७५ कोटी रुपये खर्च झाले असून संपूर्ण महाराष्ट्रात जाहिरात आणि पोस्टर चिटकवण्यासाठीच सुमारे २० लाख खर्च झाले पण पोस्टरच्या तारखेला म्हणजे ८ डिसेंबर रोजी चित्रपट रिलीज झालाच नाही.
हा चित्रपट पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक होते मात्र चित्रपटच रिलीज होत नसल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. याचे कारण सांगताना शहाजी पाटील म्हणतात की, चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याने सर्वात प्रथम मी आपली सर्वांची माफी मागतो. बाजींद हा चित्रपट रिलीज होण्यासाठी सेन्सर बोर्डाकडून मला सर्टिफिकेट मिळाले नसल्याने मी बाजिंद हा चित्रपट प्रदर्शित करू शकत नाही. सप्टेंबर मध्ये हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे पाठवण्यात आला होता. २१ सप्टेंबर रोजी तीन वाजता माझ्या बाजिंद या चित्रपटाचे स्क्रीनिंग झाले. त्यानंतर मला मेल द्वारे १८ ते २० शब्दाचे कट देण्यात आले. त्यांचे म्हणणे होते की हे शब्द सेक्स्युल किंवा डबल मिनिंग आहेत. मराठी ग्रामीण भाषा व त्या शब्दांचा अर्थ खरच बोर्डावर असणाऱ्या तज्ञांना समजतो का ? हा एक संशोधनाचा विषय ठरू शकतो. चित्रपटातील ‘पाटील पिळतोय मिशाला’, ‘जाळ हळूच लावतोय सशाला’ या ओळीवर पहिलं ऑब्जेक्शन घेण्यात आलं, आणि हे शब्द डबल मीनिंग आहेत असा सेन्सर बोर्डाने शेराच मारला आणि मला धक्काच बसला. बाजिंद चित्रपटात येसाकाकू हे एक पात्र आहे, ते भाड्याच्या गाडीतून उतरल्यावर भाड्याच्या गाडीचे पैसे देण्याच्या अनुषंगाने तो शब्द वापरलेला. भाड्या या शब्दावर सुद्धा सेन्सॉर बोर्डाने ऑब्जेक्शन घेतले. तिला मी काळजात कोरली, कांडणकुंडण करणे , लक्कडकोटात घालून मारणे, भडवीच्यानो यासारख्या ग्रामीण शब्दांवर देखील सेन्सॉर बोर्डाने ऑब्जेकशन घ्यावं यासारखे दुर्दैव नाही . ग्रामीण बोली भाषेत सर्रासपणे बोलल्याजाणाऱ्या या शब्दांचे विश्लेषण करून सुद्धा मला हे शब्द म्यूट करावे लागतील किंवा आपणास ए सर्टिफिकेट घ्यावं लागेल असे २९ नोव्हेंबर रोजी सेन्सॉर बोर्डा कडून सांगण्यात आले. माझी ८ डिसेंबरला फिल्म रिलीज होणार होती. त्यामुळे मी ए सर्टिफिकेट साठी राजी झालो. मला ए सर्टिफिकेटसाठी सेन्सर बोर्डाने मेल पाठवायला सांगितले ए सर्टिफिकेट साठी मेल पाठवल्यानंतर सुद्धा मला आणखी दोन शब्द म्यूट करायला सांगितले.
ए सर्टिफिकेट असणाऱ्या बऱ्याच चित्रपटांमध्ये आयघाल्या हा शब्द आपणास सर्रास वापरलेला पाहायला मिळतो. पण मी ए सर्टिफिकेट घेऊन सुद्धा तो शब्द वापरायला बंदी केली. रिलीज डेट जवळ आल्याने नाइलाजास्तव मी एक दोन शब्द म्यूट केले आणि सेन्सर बोर्डाला मेल केला.पण मृगजळचं ते. ८ तारखेला फिल्म रिलीज होतेय याचा एका बाजूला आनंद होता. महाराष्ट्रभर केलेली पब्लि्सिटी जागोजागी लावलेले पोस्टर, जाहीर केलेली रिलीज डेट पब्लि्सिटी साठी केलेला खर्च, सोशल मीडियासाठी पेरलेला पैसा, या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी ए सर्टिफिकेट घेऊन फिल्म ८ डिसेंबर रोजी रिलीज करायचीच येवढाच विचार मनात घोळत होतो. पण एवढं सर्व करूनही मला आज अखेर सेन्सर सर्टिफिकेट मिळू शकले नाही. याच दुःख होतय. एखादा नवीन निर्माता नवीन विषय घेऊन, नवीन काहीतरी रसिक प्रेक्षकांना द्यायचा प्रयत्न करत असेल तर अशा व्यवस्थेमुळे प्रोजेक्टच्या निर्मितीसाठी करोडो रुपये लावलेल्या निर्मत्याला आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही. तूर्तास चित्रपट प्रदर्शित होत नसल्याचे दुःख आहेच पण तुमचे प्रेम असेच राहू द्या. येत्या काही दिवसांत चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करेल अशी खंत त्यांनी बोलून दाखवली आहे.