
मराठी मालिका ,नाट्य अभिनेत्री तसेच मॉडेल असणाऱ्या रुपाली कदमला रस्ते अपघातात चेहऱ्यावर गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. पावसाळ्यात रस्ते अपघाताची दाट शक्यता असते पण इथे रुपालीच्या बाबतीत उलट घडले असे म्हणावे लागेल. रुपाली कदम ही थिएटर आर्टिस्ट आहे. मॉडेलिंगची आवड असल्याने तिने विविध सौंदर्य स्पर्धेत सहभाग दर्शवला आहे. झी मराठीच्या ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेत तिने महत्वाची भूमिका साकारली होती. याशिवाय झी च्याच ‘तू तेव्हा तशी’ मालिकेत तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती.
काल रुपाली तिच्या बाईकवरून जात असताना एका सिग्नलजवळ थांबली. आजूबाजूला कोणतीच वाहने नसल्याने मागून येणाऱ्या बसचा तिच्या बाईकला जोराचा धक्का बसला. यामुळे रुपाली बाईकसहित खाली पडली. सिग्नलवरचा अपघाताचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या अपघाताने रुपालीच्या चेहऱ्याला दुखापत झाली आहे. पण डोक्यावर हेल्मेट असल्याने मी या अपघातातून सुखरूप बचावले असे ती सांगते. मी हेल्मेट घातलं म्हणून खांदा आणि मानेला गंभीर दुखापत झाली नाही असे ती म्हणते.

या अपघाताबद्दल रुपाली सांगते की, “शिवजीच्या आशीर्वादाने मी सुखरूप आहे. या नवीन जीवनासाठी मी कृतज्ञ आणि आभारी राहील. माझा अपघाताचा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल की सुरक्षिततेला प्राधान्य का द्यावे? मी हेल्मेट घातल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होण्याचा धोका कमी झाला. यामुळे चेहरा, खांदा आणि मानेला गंभीर दुखापत होण्याचा धोकाही कमी झाला. भारतात बाइक आणि स्कूटर चालवणाऱ्यांसाठी हे किती गरजेचे आहे यावरून तुम्हाला समजेल. माझ्या फिटनेस रूटीनमुळे मला फारशी गंभीर शारीरिक दुखापत झाली नाही. पण चेहऱ्यावर सूज आहे.” असे ती सांगते.