अभिनय क्षेत्र हे बेभरवशाचं असतं असं मानलं जातं. त्यामुळे बरेचसे कलाकार व्यवसायाकडे वळली आहेत. पण काही कलाकार राजकीय क्षेत्रात किंवा सामाजिक क्षेत्रातही नशीब आजमावताना दिसली आहेत. अगदी बॉलिवूडचे सेलिब्रिटी सुद्धा राजकिय क्षेत्रात उतरताना दिसतात त्यामुळे मराठी कलाकारांनाही आता अशा संधी मिळू लागल्या आहेत. खरं तर एक काळ अभिनय क्षेत्र गाजवणाऱ्या या कलाकारांमध्ये नावाजलेले नाव पाहायला मिळते. त्यातील काही ५ अभिनेत्री इथे जाणून घेऊयात…
हरिओम विठ्ठला, रमाबाई भीमराव आंबेडकर, तीन बायका फजिती ऐका, आम्ही चमकते तारे, काळूबाई पावली नवसाला, गोंदया मारतय तंगडं, पोलिसलाईन, श्यामची शाळा अशा चित्रपटात कधी नायिका तर कधी सहाय्यक भूमिकेत दिसणारी अभिनेत्री निशा परुळेकर तुम्हाला आठवत असेल. मकरंद अनासपुरे, भरत जाधव यांच्यासोबत निशाला काम करण्याची संधी मिळाली होती. पण गेली अनेक वर्षे निशा परुळेकर अभिनय क्षेत्र सोडून राजकारणात सक्रिय झालेल्या पाहायला मिळतात. ठाण्यातील भाजपाच्या सांस्कृतिक विभागात त्या सहसंयोजक पदी काम करत आहेत. २०१७ साली त्यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढली होती. पण काहीच मताने त्यांचा पराभव झाला होता. सुरेश बंगेरा यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या आहेत. मयुरी ही त्यांची एकुलती एक मुलगी सोशल मीडिया स्टार आहे. इन्स्पिरेश स्पीचसाठी ती ओळखली जाते.
अभिनय क्षेत्रातून बाजूला झालेली दुसरी अभिनेत्री आहे प्रिया बेर्डे. प्रिया बेर्डे या आता संपूर्णपणे राजकारणात रमलेल्या पाहायला मिळतात. बालकलाकार, प्रमुख नायिका, सहाय्यक भूमिका ते अगदी खलनायिका म्हणूनही त्यांनी या सृष्टीत काम केले आहे. पण आता मनोरंजन विश्वातून ब्रेक घेत त्यांनी राजकारणात उतरण्याचे ठरवले आहे. सुरुवातीला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हातात घेतला होता पण त्यानंतर आता त्यांनी भाजपचा झेंडा हातात घेतला आहे. कलाकारांचे प्रश्न सोडवता यावेत यासाठी सांस्कृतिक विभागात त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
अभिनय क्षेत्र सुडून पूर्णपणे राजकारणात स्थिरावलेली तिसरी अभिनेत्री आहे दीपाली भोसले सय्यद. दीपालीने एक अभिनेत्री म्हणून मराठी चित्रपट सृष्टीचा एक काळ चांगलाच गाजवला होता. पण आता दीपाली सय्यद या समाजकारण आणि राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. त्यांनी स्वतःच्या नावाने चॅरिटी ट्रस्ट उभारला असून या माध्यमातून त्या गरजूंच्या मदतीला धावून येत असतात. कोल्हापूरच्या पूरपरिस्थितीत अडचणीत सापडलेल्या कुटुंबातील मुलींची स्वखर्चाने लग्न लावून देण्याचे काम त्यांनी केले होती. तसेच कोकणातही त्यांनी मदतीचा ओघ सुरू ठेवला होता.
सामाजिक बांधिलकी जपणारी ही चौथी अभिनेत्री आहे तृप्ती भोईर. अगडबम या चित्रपटामुळे तृप्ती भोईरचे नाव घराघरात पोहोचले आहे. म्युजिक कम्पोजर टी सतीश चक्रवर्ती सोबत तिने लग्न केले. यानंतर तृप्तीने समाजकारणात उतरण्याचे धाडस दाखवले. शेल्टर फाउंडेशनची स्थापना करून तिने पालघर मधील आदिवासी महिलांच्या हाताला काम मिळवून दिले आहे. सध्या तृप्ती भोईर या समाजकारणात सक्रिय असल्या तरी त्या अभिनय क्षेत्र सोडून निर्मिती क्षेत्रात वळल्या आहेत. पारो हा त्यांची निर्मिती असलेला आगामी हिंदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
भिनय क्षेत्रातून राजकारणात, समाजकारणात सक्रिय असलेली ५ वी अभिनेत्री आहे राजश्री लांडगे. गाढवाचं लग्न चित्रपटात राजश्रीने गंगीची भूमिका गाजवली होती. नाथा पुरे आता,सिटीझन अशा चित्रपटातून ती झळकली आहे पण अभिनय आणि निर्माती म्हणून ओळख निर्माण करण्याअगोदर तिचा राजकारणाशी जवळचा संबंध आहे. राजश्रीचे आजोबा कर्मवीर मारुतीराव लांडगे पाटील हे राजकारणातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखलं जातं. तर तिचे वडीलही पाटबंधारे खात्यात सचिव म्हणून कार्यरत होते. त्यामुळे राजकारण आणि समाजकारण याचा तिला जवळचा अनुभव आहे. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कळंब हे राजश्रीचं गाव. आजोबांच्या पावलावर पाऊल टाकत राजश्री देखील समाजकारणात उतरली आहे.