वयाच्या १६ व्या वर्षी या अभिनेत्रीने चक्क आजोबांना घेतले दत्तक…अभिनय क्षेत्रातून बाहेर पडलेल्या अभिनेत्रीचा संघर्षमय प्रवास
मराठी इंडस्ट्रीत खूप कमी असे कलाकार आहेत जे दुसऱ्यांचा विचार करतात. आज ह्या ह्या कलाकाराने एवढं मोठं नाव कमावलं पण त्याने कुणाला एक दमडीही दिली नाही म्हणून त्याला ट्रोल करतो. पण कधी काळी एकाचवेळी चार पाच मालिका गाजवणारी अभिनेत्री जेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करते तेव्हा कुठेतरी तिचे कौतुक केले जावे अशीच एक मनापासून इच्छा असते. अशा संघर्षातून स्वतःची ओळख बनवणाऱ्या अर्चना नेवरेकर या गुणी अभिनेत्रीबद्दल आज अशाच काही खास गोष्टी जाणून घेऊयात. २००६ नंतर अर्चना नेवरेकर यांनी अभिनय क्षेत्रातून काढता पाय घेतला. लक्ष्मीकांत बेर्डे, मिलिंद गवळी यांच्यासोबत तिने चित्रपटातून काम केले. पण आता समाजाचं आपण काहितरी देणं लागतो या उद्देशाने त्या अनेक गोष्टी करत आहेत. बालपण अतिशय हालाकीच्या परिस्थितीत गेलेल्या अर्चना नेवरेकर यांनी खूप कमी वयातच काम करण्यास सुरुवात केली होती.
घरी पाच मुली जन्माला आल्याने तिच्या वडिलांना वेडाचे झटके येऊ लागले अशातच त्यांचे निधन झाले. वडिलांचे छत्र हरवल्याने तिच्या आईने खंबीर राहून मुलींचे पालनपोषण केले. शाळेत असल्यापासूनच अर्चना नाटकातून काम करत असे. सुलभा देशपांडे, निलकांती पाटेकर यांच्या गोकुळ मालिकेत बालकलाकराची भूमिका मिळाली. या मालिकेत काम करण्याचे ५०० रुपये मिळायचे. पण त्यांच्याकडे हे एवढे मोठे पैसे पाहून बँकेतील लोकांना विश्वास बसत नव्हता. तेव्हा अनेकदा अपमान सहन करावा लागला. पुढे एसएनडीटी कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षात शिकत असताना विद्या दामिनी, स्वामीनी, बंदिनी आशा तब्बल पाच मालिका आल्या. त्यामुळे तिला शेवटच्या वर्षाची परीक्षा देता आली नाही. प्रत्येक अर्ध्या तासाला टीव्हीवर तिच्या मालिका सुरू असायच्या. यादरम्यान अर्चनाला खूप लोकप्रियता मिळत गेली. चालू नवरा भोळी बायको यानंतर त्यांनी काम करायचं थांबवलं. दरम्यान करूया उद्याची बात हा चित्रपट निर्मित केला. अशाच एका अवॉर्ड सोहळ्यात त्यांच्या हस्ते बक्षीस द्यायचे होते तेव्हा इंडस्ट्रीतील काही लोकांनी आयोजकाला हटकले की, हिच्या हातून देण्यापेक्षा कोणीतरी चांगली व्यक्ती बघ. हे शब्द जेव्हा कानावर पडले तेव्हा त्यांचे मन खूप दुखावले. तेव्हाच त्यांनी ठरवलं की आपण स्वतःचा एक अवॉर्ड सोहळा आयोजित करायचा. तेव्हा संस्कृती कलादर्पणची स्थापना केली. या अवॉर्ड सोहळ्यातून अनेक कलाकारांना लाखोंचे बक्षीस देण्यात येते. समाजाचं आपण काहितरी देणं लागतो या हेतूने अर्चना यांनी फेस्टिव्हल सुरू केले ज्यातून प्रेक्षकांना मोफत चित्रपट, नाटक पाहता आली. निर्मात्यांना केवळ पुरस्कार न देता दोन लाखांचे मानधन देण्यात येऊ लागले. त्यामुळे त्यांनाही आर्थिक मदत होऊ लागली. मदतीची ही जाण त्यांना खूप कमी वयातच आली होती, कारण वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी एका आजोबांना दत्तक घेतले होते. कुठलंही नातं नसताना त्या आजोबांना त्यांनी २०, २२ वर्ष सांभाळलं होतं. ते आजोबा गोगटेवाडीत राहायला होते त्यांचा भाचा परदेशात सर्जन होता , नाटकाच्या निमित्ताने ते अर्चनाच्या घरी गप्पा मारायला यायचे.
ते खूप ऍक्टिव्ह असल्याने अर्चना त्यांना शूटिंगला सोबत घेऊन जायची. अशातच माणूस चित्रपटात ते एका छोट्याशा भूमिकेत झळकले होते. खरं तर त्या आजोबांना जेव्हा घरी आणले तेव्हा अर्चनाची आई तिला खूप ओरडली होती. पण आईचा विरोध असतानाही अर्चनाला त्या आजोबांचा लळा लागला होता. आजोबांचं लग्न झालं नव्हतं घरी पण घरी खूप प्रॉब्लेम असायचे म्हणून एक दिवस त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तेव्हापासून अर्चनाने त्यांना आसरा दिला होता. कुटुंबतील एका व्यक्ती प्रमाणेच ती त्यांचा सांभाळ करू लागली. एक दिवस आजोबांना खूप अस्वस्थ जाणवू लागलं तेव्हा तिने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्यादिवशी त्यांनी अर्चनाचा हात हातात घेतला आणि श्वास सोडला.याच कारणास्तव अर्चनाने पुढे ‘स्नेहधाम’ ट्रस्ट सुरू केले. या माध्यमातून वृद्धांना मदत होऊ लागली. एवढेच नाही तर ज्येष्ठ रंगकर्मीचे हेल्थ चेकअप, बॅक आर्टिस्टला मदत केली जाऊ लागली. पण या सर्वात मराठी इंडस्ट्रीतील काही मोठ्या कलाकारांनी नाकं मुरडली. अर्चना गरजूंच्या मदतीला वेळोवेळी धावून जाते. या कामात तिच्या जवळच्या मैत्रिणींची तिला साथ मिळते. अजून खूप काही करण्याची ईच्छा तिने व्यक्त केली आहे. त्यामुळे या कामासाठी तिचे नक्कीच कौतुक व्हायला हवे हीच एक माफक अपेक्षा.