मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर याप्रमाणे आता सातारा जिल्ह्यातील कलाकार मंडळींनी मराठी सृष्टीत अभिनयाची छाप पाडली आहे. या जिल्ह्यातील कलाकारांनी केवळ प्रेक्षकांचे मनोरंजनच केले नाही तर सातारा जिल्ह्यात मालिकेच्या शूटिंगला प्रोत्साहन सुद्धा मिळवून दिले आहे. त्यामुळे सातारा जिल्हा कला सृष्टीत स्वतःची एक वेगळी छाप पाडताना दिसत आहे. याअगोदर मराठी सृष्टीतील कलाकार मंडळी धुलीवंदन हा सण पुण्यात, ठाण्यात किंवा मुंबईत साजरा करत होते पण आता चित्रनगरी सातारा ग्रुपने ‘रंगोत्सव’ सुरू करून एक वेगळी ओळख बनवण्याचा प्रयत्न केला आहे. येत्या २४ मार्च रोजी होळीचे औचित्य साधून दुपारी ४ वाजता सातारा जिल्ह्यातील कलाकारांनी कलाकारांसाठी कराड, उंब्रज येथील हॉटेल सरोवर मध्ये हा रंगोत्सवाचा सोहळा आयोजित केला आहे.
या सोहळ्याला सयाजी शिंदे, शशिकांत डोईफोडे, विजय निकम, मोनालीसा बागल, अश्विनी बागल, दिग्दर्शक अनुप जगदाळे, वासु पाटील, मकरंद गोसावी, सत्यवान शिखरे, लेखक विशाल कदम, पोपट सानप, महादेव शिरोळकर, अमान खान हे नामवंत कलाकार सहभागी होणार आहेत. याशिवाय बॅक आर्टिस्ट, तंत्रज्ञ टीम देखील या उत्सवात सहभागी होणार आहे. रंगांची उधळण, गाणी, नृत्य आणि ही धमाल मजामस्ती अनुभवण्यासाठी आता सातारचे रंगकर्मी, चित्रकर्मी सज्ज झालेले आहेत. या सोहळ्याला सहभागी होण्यासाठी कलाकारांना आमंत्रण दिले जात आहे. मराठी कलाकार गेली अनेक वर्षे धुळवड साजरी करत असतात.
कलाकारांची जाण्यायेण्याची अडचण होऊ नये म्हणून ही धुळवड कधी ठाण्यात तर कधी मुंबईत साजरी केली जाते. पण गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील बरेचसे कलाकार छोटा मोठा पडदा गाजवू लागले आहेत. त्यामुळे त्यांनीही त्यांचा एक स्वतंत्र रंगोत्सव सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रनगरी सातारा ग्रुपने यावर निर्णय घेतला असून येत्या २४ मार्चला हा रंगोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यामुळे या रंगोत्सवाला आणखी कोणकोणते सेलिब्रिटी हजेरी लावणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.